दुबई - भारतीय महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजने आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थान कायम राखलं आहे. आज आयसीसीने ताजी क्रमवारी जारी केली आहे. यात मिताली राज पहिल्या स्थानी कायम आहे. परंतु तिला दक्षिण आफ्रिकेची लिजेली ली याची कडवी टक्कर मिळाली आहे. लिजेली ली हिने मोठी झेप घेत मितालीसोबत संयुक्तपणे अव्वलस्थानी पोहोचली आहे. ली आणि मितालीचे समाने 762 गुण आहे. मिताली जुलैमध्ये आपल्या एकदिवसीय क्रिकेटच्या कारकिर्दीत नवव्यांदा पहिल्या स्थानावर पोहोचली होती. तिने 16 वर्षांपूर्वी पहिल्यांदा अव्वलस्थान पटकावले होते.
महिला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वाधिक धावा करणारी मिताली राज हिने इंग्लंडविरुद्ध यावर्षी झालेल्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली होती. याचा तिला फायदा झाला. मितालीसोबत लिजेली संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय मालिका पार पडली. यात मालिकेतील पहिल्या सामन्यात तिने नाबाद 91 धावांची खेळी केली. तिच्या या खेळीच्या जोरावर आफ्रिकेने सामना जिंकला. या कामगिरीचा फायदा लिजेली ली हिला आयसीसी क्रमवारीत झाला. ती मितालीसोबत अव्वलस्थानी पोहोचली. लिजेली ली सोबत दक्षिण आफ्रिकेचीच अयोबोगना खाका हिची क्रमवारी सुधारली आहे. ती एका स्थानाच्या सुधारणेसह सातव्या स्थानी पोहोचली आहे.
भारताची डावखुरी सलामीवीर स्मृती मंधाना 701 गुणांसह नवव्या स्थानावर कायम आहे. मिताली आणि स्मृती शिवाय इतर कोणती भारतीय महिला खेळाडू टॉप-10 मध्ये नाहीत. टी-20 गोलंदाजी क्रमवारीत इंग्लंडची गोलंदाज सारा ग्लेन दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका 2-1 ने जिंकली. यात न्यूझीलंडची लेह कास्पेरेक हिने सहा गडी बाद केले होते. ती या कामगिरीसह सात स्थानाच्या सुधारणेसह 15व्या स्थानी विराजमान झाली आहे.
हेही वाचा - IND W vs AUS W: यजमान ऑस्ट्रेलियाला स्मृती मंधानाचा गर्भित इशारा, म्हणाली...
हेही वाचा - मॅथ्यू हेडन पाकिस्तान क्रिकेट संघाचे नूतन मुख्य प्रशिक्षक