नवी दिल्ली ICC Ranking : एकदिवसीय विश्वचषक २०२३ ची समाप्ती झाल्यानंतर आयसीसीनं फलंदाज आणि गोलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. विश्वचषकात विक्रमी ७६५ धावा करणारा फलंदाज विराट कोहली अव्वल स्थानाच्या अगदी जवळ पोहोचलाय.
विराट कोहलीच्या रेटिंगमध्ये सुधारणा : ताज्या रँकिंगनुसार, विराट कोहली ७९१ रेटिंगसह तिसऱ्या स्थानी, तर कर्णधार रोहित शर्मा ७६९ रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. विराट कोहली यापूर्वी २०१७ ते २०२१ या कालावधीत अव्वल स्थानी होता. कोहलीनं २०२३ विश्वचषक स्पर्धेत कोणत्याही विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला. यामुळे त्याच्या रॅंकिंगमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. याशिवाय रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनीही या विश्वचषकात दमदार कामगिरी केली. त्यामुळे त्यांनाही रॅंकिंगमध्ये फायदा झालाय. भारताचा सलामीवीर शुभमन गिल अव्वल स्थानी कायम असून, पाकिस्तानचा कर्णधार दुसऱ्या स्थानी आहे.
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल ५ फलंदाज :
- शुभमन गिल - ८२६ रेटिंग गुण
- बाबर आझम - ८२४ रेटिंग गुण
- विराट कोहली - ७९१ रेटिंग गुण
- रोहित शर्मा - ७६९ रेटिंग गुण
- क्विंटन डी कॉक - ७६० रेटिंग गुण
गोलंदाजांची क्रमवारी : गोलंदाजांच्या क्रमवारीबद्दल बोलायचं झालं तर, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी अव्वल १० गोलंदाजांच्या क्रमवारीत आपलं स्थान कायम ठेवलंय. मात्र मोहम्मद सिराज ६९९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरला असून, शमी एक स्थान घसरून १०व्या स्थानावर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड ७०३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजनं ७४१ रेटिंग गुणांसह आपलं अव्वल स्थान मजबूत ठेवलंय.
मोहम्मद शमीची शानदार कामगिरी : मोहम्मद शमीनं या विश्वचषकात शानदार कामगिरी केली. तो विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणार गोलंदाज होता. त्यानं केवळ ७ सामन्यात २४ विकेट घेतल्या. त्यानं तीन वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. याशिवाय तो एकदिवसीय विश्वचषकात सर्वात वेगवान ५० बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.
हेही वाचा :