मुंबई - इंग्लंडच्या साउथम्पटनमध्ये पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव केला. दुसऱ्या डावात भारतीय संघाने आणखी काही धावा केल्या असत्या तर, कदाचित सामन्याचा निकाल काही वेगळा लागू शकला असता, असे मत अनेक माजी खेळाडूंनी मांडलं आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या सामन्यात बेजाबदार फटका मारताना बाद झाला. यावरुन भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने पंतवर टीका केली आहे.
इरफान पठाण एका क्रीडा माध्यमासाठी समालोचन करतो. अंतिम सामन्यात पंत ज्या पद्धतीने बेजबाबदार फटका मारून बाद झाला ते पाहून इरफान निराश झाला. याविषयावर बोलताना पठाण म्हणाला, 'आक्रमकता आणि मूर्खपणा यात थोडा फरक आहे. जलद गोलंदाजाविरुद्ध पुढे येऊन षटकार मारणे, आक्रमकता नव्हे तर मूर्खपणा आहे.'
हेही वाचा - 'WTC च्या विजयाने २०१९ विश्वकरंडक फायनलमधील पराभवाचं नुकसान भरून निघालं'
दरम्यान, भारतीय संघाने याच वर्षी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. पंतने या दौऱ्यात दमदार फलंदाजी केली. त्याच्यासह इतरांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-१ ने जिंकली. या मालिका विजयामुळे भारतीय संघाची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची दावेदारी भक्कम झाली. परंतु अंतिम सामन्यात मात्र पंत चूकीचा फटका मारून बाद झाल्याचे पाहायला मिळाले.
पंतने दुसऱ्या डावात ८८ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तो ट्रेंट बोल्टला पुढे येऊन षटकार मारण्याचा प्रयत्नात झेल बाद झाला. त्यामुळे पठाणने त्याच्यावर टीका केली आहे. त्यांच्या मते, पंतने जबाबदारी ओळखून आणखी काही षटके गोलंदाजी करायला हवी होती.
हेही वाचा - WTC स्पर्धेत कोणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स अन् कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा
हेही वाचा - चॅम्पियन ट्रॉफी २०१३ नंतर भारतीय संघाची ICC स्पर्धांमधील कामगिरी