हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असा ज्याचा लौकिक आहे तो म्हणजे महेंद्रसिंह धोनी उर्फ माही. कॅप्टन कुल धोनीला 'हेलिकॉप्टर शॉट'चा जनक म्हणून ओळखले जाते. कर्णधार, फलंदाज, यष्टीरक्षक यातील त्याच्या यशस्वी कामगिरीमुळे धोनी कोट्यवधी चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला. आज 7 जुलै. आज याच माहीचा 40वा वाढदिवस. धोनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने घेतलेला त्याच्या यशस्वी कारकिर्दीचा आढावा...
धोनीने भारतासाठी 15 वर्षांहून अधिक काळ क्रिकेटचे सामने खेळले. तो एकेकाळी आईसीसी रँकिंगमध्ये काही वर्षांपर्यंत एकदिवसीय (वनडे) क्रिकेटमध्ये सर्वोकृष्ट फलंदाजही होता. धोनीला जागतिक क्रिकेटचा सर्वश्रेष्ठ फिनिशर म्हणूनही ओळखले जाते. धोनीने अनेकवेळा भारतासाठी उत्तम फलंदाजी करत सामना खेचत आणला होता. इतकेच नव्हे टी-20 वर्ल्डकप, एकदिवसीय वर्ल्डकप, ऑस्ट्रेलियातील मालिकाविजय, चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद, कसोटीत प्रथमच प्रथम क्रमांकाचा संघ होणे इत्यादी गोष्टीत त्याचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही.
कारकीर्द -
40 वर्षीय धोनीने आतापर्यंत भारतासाठी 350 एकदिवसीय 98 टी-20 सामने खेळले असून त्याने अनुक्रमे 10773 आणि 1617 धावा केल्या आहेत. 2005 ते 2014 या कालावधीत धोनीने 90 कसोटी सामने खेळले. या प्रकारात त्याने 4876 धावा ठोकल्या. कोट्यवधी भारतीयांची मने जिंकणाऱ्या धोनीने अखेर 15 ऑगस्ट 2020रोजी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
वनडेतील सर्वोत्कृष्ट खेळी -
183 v/s श्रीलंका 2005 -
2005 मध्येच जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये खेळलेल्या सामन्यात धोनीने अपल्या कारकीर्दीतील सर्वाधिक धावा काढल्या होत्या. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकाने कुमार संगकाराच्या शतकी खेळीच्या जोरावर 298 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात धोनीच्या 145 चेंडूमध्ये 183 धावा नाबाद खेळीच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला. यावेळी धोनीने 15 चौकार आणि 10 षटकार खेचले होते.
टेस्टमधील सर्वोत्कृष्ट खेळी -
224 v/s ऑस्ट्रेलिया, 2013 -
2012-13 साली बॉर्डल-गावस्कर मालिकेच्या पहिल्या सामन्यात धोनीने चेन्नईतील एमए चिदम्बरम मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 265 चेंडूमध्ये 24 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने तुफानी फटकेबाजी करत अपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिली द्विशतकी खेळी केली होती. भारतीय संघाने या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला 8 गडी राखत धुळ चारली होती.
कर्णधार ते 'लीडर' -
'महेंद्रसिंह धोनी' हे असे नाव आहे, जे क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर मोठ्या उत्साहाने घेतले जाते. आयसीसीच्या तिन्ही चषकांवर अधिराज्य गाजवणारा, हुशार, धाडसी आणि संयमी अशी विशेषणे धोनीला दिली जातात. संघाच्या विजयानंतर सर्वात मागे उभा राहणारा आणि संघाला गरज भासल्यावर नेहमी धावून येणारा खेळाडू अशी धोनीची विशेष ओळख आहे. 'चॅम्पियन बोर्डा'सोबत विजयाचा आनंद साजरा करतानाच्या अनेक फोटोंमध्ये धोनी एका बाजूला उभा असल्याचा दिसून येतो. 2018 आयपीएल हंगामाच्या विजयाच्या वेळी जेव्हा सर्व खेळाडू उत्सव साजरा करत होते, तेव्हा धोनी आपल्या मुलीसमवेत खेळत होता.
शेवटचा सामने -
धोनीने आपला शेवटचा एकदिवसीय सामना 2019 विश्वकप स्पर्धेत न्यझीलंडविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने 72 चेंडूंत एका चौकार आणि एका षटकारासह 50 धावा केल्या होत्या. तसेच धोनीने आपला शेवटचा टेस्ट सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबर 2014मध्ये खेळला होता. या सामन्यात त्याने पहिल्या डावात 11 तर दुसऱ्या डावात 24 धावा केल्या होत्या. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना फेब्रुवारी 2019मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने 23 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने एकूण 40 धावा केल्या होत्या.
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन धोनाबद्दल काय म्हणाले?
धोनीने क्रिकेटवर नेहमी प्रेम केले. जेव्हा कधी त्याला क्रिकेटमधून वेळ मिळाला, तेव्हा तो जगापासून दूर राहिला. खंबीर भूमिका आणि त्यानंतर सामन्याचा निकाल ही धोनीच्या कर्णधारपदाबद्दलची सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. ''जर मला युद्धाला जावे लागले, तर मी धोनीला सोबत घेईन'', असे टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन म्हणाले होते. कर्स्टन यांचे हे वाक्य धोनीच्या स्वभावाची झलक देऊन जाते. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर एकदा म्हणाला होता की, धोनी त्याच्याबरोबर खेळलेल्या सर्व कर्णधारांपैकी सर्वोत्तम आहे. सचिनचे हे शब्द धोनीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगून जातात.
आंतरराष्ट्रीय पदार्पण अन् कारकिर्दीचा अंतही धावबाद होऊनच..!
धोनीचा पहिला आणि त्याच्या शेवटच्या सामन्यातील एका घटनेमध्ये विलक्षण साम्य आहे. ते म्हणजे या दोन्ही सामन्यात धोनी धावबाद झाला होता. २३ डिसेंबर २००४ या वर्षी धोनीने चितगांव येथे बांगलादेशविरुद्ध वन-डे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात धोनी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना धावबाद झाला होता. त्याला खलिद मसूद आणि तपस बैस्या या जोडीने धावबाद करून 'पाविलियन'मध्ये पाठवले होते. त्याच्या करियरच्या पहिल्या सामन्यातच त्याला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यानंतर, १७ वर्षांनी म्हणजेच २०१९ या वर्षी विश्वचषकात भारत विरुद्ध न्युझीलंड सामन्यात असाच प्रकार घडला होता. १० जुलै २०१९ रोजी खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात धोनी मार्टिन गुप्टीलच्या अचूक फेकीवर धावबाद झाला होता.
यशोशिखरावर पोहोचूनही मित्रांसोबत कधीच बदलला नाही -
भारताचा 'स्टार' क्रिकेटर झाल्यानंतरही धोनी त्याच्या जुन्या मित्रांसाठी अजिबात बदलला नाही. काही वर्षांपूर्वी कोलकात्यात असाच एक प्रसंग पाहायला मिळाला. धोनीला त्याचा एक जुना मित्र भेटला. हा मित्र स्टेशनवर चहाचे दुकान लावायचा. धोनीने त्याला ओळखले आणि त्याला मोठ्या आनंदाने मिठी मारली. त्यावेळी धोनी विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी कोलकाता येथे गेला होता. स्टेडियममधून बाहेर पडताना धोनीने एक माणूस ड्रेसिंग रूमच्या बाहेर उभा असल्याचे पाहिले. थॉमस नावाचा हा माणूस धोनीला भेटायला उभा होता. धोनीनेही लगेच त्याला ओळखले आणि मिठी मारली. त्यानंतर तो थॉमसला त्याच्याबरोबर जेवणासाठी हॉटेलमध्ये घेऊन गेला. धोनीला भेटल्यानंतर खूप आनंदित असलेला थॉमस म्हणाला, “जेव्हा धोनी खडगपूर रेल्वे स्टेशनवर कामाला होता, तेव्हा तो चहा घेण्यासाठी दुकानात येत असे. त्या काळात त्याने माझ्या दुकानात गरम दूधही प्यायले आहे. आता धोनीला भेटल्यानंतर मी माझ्या दुकानाचे नाव 'धोनी टी स्टॉल' ठेवेन.'' खडगपूर रेल्वे स्थानकात थॉमसचे चहाचे दुकान आहे. धोनी जेव्हा या स्टेशनवर टीसीची नोकरी करत होता, तेव्हा तो थॉमसकडे दिवसातून दोन ते तीन वेळा चहा प्यायला जात असे.