मुंबई - जपानच्या टोकियोमध्ये ऑलिम्पिक सुरू असून या ऑलिम्पिकसाठी भारताने 127 सदस्यीय दल पाठवला आहे. तर भारताचा शेजारी देश पाकिस्तान, केवळ 10 सदस्यांसह ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाला आहे. या विषयावरून पाकिस्तानचा माजी सलामीवीर फलंदाज इम्रान नजीर भडकला असून त्याने या कारणासाठी जबाबदार असलेल्यांना, लाज वाटली पाहिजे, असे म्हटलं आहे.
पाकिस्तान 10 खेळाडूंसह टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला आहे. पाकिस्तानची लोकसंख्या 22 कोटीहून अधिक आहे आणि खेळाडूंची संख्या पाहता ती अत्यल्प आहे. हे पाहून पाकिस्तानचा माजी क्रिकेटर इम्रान नजीर भडकला. त्याने, ही बाब दु:खद असून यासाठी जबाबदार असणाऱ्या प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे, अशा आशयाचे ट्विट केलं आहे.
दरम्यान, जरी इम्रान नजीरने पाकिस्तानची अवस्था पाहून नाराजी व्यक्त केली असली तरी ऑलिम्पिकचा कोटा खेळाडूंना मिळवावा लागतो. पाकिस्तानचे खेळाडू तो कोटा मिळवण्यासाठी अपयशी ठरले. यामुळे त्यांना टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेता आलं नाही.
टोकियोत पाकिस्तानच्या दलाकडून कोरोना नियमांची पायमल्ली -
टोकियो ऑलिम्पिकच्या उद्धाटन सोहळ्यात पाकिस्तानच्या ध्वजवाहकांनी कोरोनाच्या नियमांची पायमल्ली केली. शुक्रवारी जपानच्या नॅशनल स्टेडियममध्ये टोकियो ऑलिम्पिकचा उद्धाटन सोहळा पार पडला. पाकिस्तानचे ध्वजवाहक या सोहळ्यात मास्क तोंडावर व्यवस्थित न लावता परेडमध्ये सहभागी झाले होते.
पाकिस्तान दलाच्या ध्वजवाहकाचा मान बॅडमिंटनपटू महूर शहजाद आणि नेमबाज खलील अख्तर यांना मिळाला होता. परेड दरम्यान, महूरचा मास्क तोंडा खाली तर खलीलची नाक मास्कने व्यवस्थित झाकलेली नव्हती. या दोघांशिवाय पाकचे इतर अॅथलेटिक्स व्यवस्थित मास्क लावलेले पाहायला मिळाले.
हेही वाचा - मोफत पिझ्झा ते ही आयुष्यभर; रौप्य पदक विजेती मीराबाई चानूसाठी पिझ्झा कंपनीची घोषणा
हेही वाचा - Tokyo Olympics: कोरोना काळात ऑलिम्पिकची तयारी सोडून रुग्णांची सेवा करणाऱ्या शूटरने जिंकलं सुवर्णपदक