मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटूसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. यात त्याने आर. अश्विनच्या ठिकाणी रविंद्र जडेजाला संधी दिली. तर दुसरीकडे त्याने जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरच्या नावाला पसंती दिली. विराटचा हा निर्णय योग्य असल्याचे भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने म्हटलं आहे. ईटीव्ही भारतशी बोलताना कैफने विविध विषयांवर आपलं मत मांडलं.
मोहम्मद कैफ म्हणाला की, विराटने खास रणणिती तयार केली होती. तो चार गोलंदाज आणि एक फिरकीपटूसह खेळला. त्याने फिरकीपटू म्हणून रविंद्र जडेजाच्या नावाला पसंती दिली. रविंद्र जडेजाने दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवला. त्याने गोलंदाजीसह फलंदाजीत योगदान दिले. यामुळे विराट नक्कीच खुश झाला असेल. व्यवस्थापनाने दुखापत झाल्याशिवाय संघात बदल करू नये.
दरम्यान, आर. अश्विनला अंतिम संघात स्थान न मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला होता. अश्विनने कसोटीत 2.80 च्या सरासरीने 413 विकेट घेतल्या आहेत. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक गडी बाद करणारा फिरकीपटू आहे. त्याने परदेशात खेळपट्टीची मदत मिळत नसताना देखील आपल्या गोलंदाजीतील विविधता दाखवत आपली छाप सोडली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने 4 गडी बाद करत विदेशी खेळपट्ट्यावर आपण बॉस असल्याचा दावा केला होता. पण रविंद्र जडेजाला फलंदाजीच्या जोरावर अंतिम संघात स्थान मिळालं. विराटचा हा निर्णय योग्य असल्याचे कैफ याने म्हटलं.
कैफ म्हणाला, सर्वसाधारणपणे व्यवस्थापन बेस्ट अंतिम संघ निवडण्यासाठी प्रयत्न करतो. तुम्ही पाहू शकता की, विराटने निवडलेल्या संघातील खेळाडूंनी मागील कसोटीत चांगली कामगिरी केली.
पहिल्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूरला दुखापत झाली. यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही. याविषयीचे अपडेट नाहीत. याविषयावर कैफ म्हणाला की, शार्दुलच्या दुखापतीमुळे विराटच्या अडचणी वाढू शकतात. शार्दुल वेगवान गोलंदाजीसह फलंदाजीत योगदान देऊ शकतो. इतर तीन गोलंदाज हे करू कत नाहीत. दुसऱ्या कसोटी सामन्यात जर सर्व जण फिट असतील तर विराटची पसंती हाच संघ असेल. जर कोणाला दुखापत झाली. तर संघाच्या अडचणी वाढू शकतात. कारण प्रत्येक जण अष्टपैलू खेळाडू नाही. दुसरीकडे इंग्लंड संघात अनेक पर्याय आहेत. आतापर्यंत त्यांनी वेगळी रणणिती आखली असेल.
दरम्यान, शार्दुल ठाकूर दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
हेही वाचा - Eng vs Ind, 2nd Test: भारताला मोठा धक्का, शार्दुल ठाकूर दुसऱ्या कसोटीतून बाहेर
हेही वाचा - Eng vs Ind: पंतला आपला नैसर्गिक खेळ करण्याची मोकळीक - विराट कोहली