साउथम्पटन (इंग्लंड) - विराट कोहलीच्या नेतृत्वात आज टीम इंडिया आजपासून न्युझिलंडविरोधात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय टीमला सामन्याआधी प्रॅक्टिस करायची संधी मिळाली नाही. त्यामुळे मॅच कशी होईल, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
भारतीय संघ अंतिम सामन्यात तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरणार आहे. संघाचे नेतृत्व विराट कोहली करेल. तर उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे.
भारतीय संघाच्या सलामीची धुरा युवा शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मधल्या फळीची जबाबदारी चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांच्या खांद्यावर आहे.
रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन अष्टपैलू भूमिका निभावतील. याशिवाय जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाज न्यूझीलंडच्या फलंदाजांना वेसण घालण्याचा प्रयत्न करतील.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या शुक्रवारपासून अंतिम सामन्याला सुरूवात होणार आहे. हा सामना इंग्लंडच्या साउथम्पटन येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी ३ वाजता सुरूवात होणार आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये या सामन्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
अशा आहेत दोन टीम -
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि रिद्धिमान साहा
न्युझिलंड : केन विलियम्सन (कॅप्टन, टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉनवे, कॉलिन डी ग्रँडहोम, मॅट हेनरी, काइल जॅमिसन, टॉम लाथम, हेनरी निकोलस, एजाज पटेल, टिम साउदी, रॉस टेलर, नील वेगनर, बीजे वाटलिंग आणिि विल यंग