चेन्नई - चेपॉक स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात १३ फेब्रुवारीपासून होणाऱ्या दुसर्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार आहे. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने (टीएनसीए) या प्रवेशासंबंधी नियमावली तयार केली आहे. स्टेडियमवर येणाऱ्या प्रत्येकाला मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.
या सामन्यासाठी टीएनसीएने १५००० प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिली आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्याची मनाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - IND vs ENG : भारताला विजयासाठी ३८१ धावांची गरज
टीएनसीएने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, "दुसऱ्या कसोटीसाठी स्टेडियमवर येणाऱ्या प्रेक्षकांना काही अटी पाळाव्या लागतील. प्रेक्षकांना तोंड आणि नाक झाकणारे मास्क वापरावे लागतील. स्टेडियमच्या आवारात सामाजिक अंतर कायम ठेवावे लागेल. कोरोनाची कोणतीही लक्षणे जसे ताप, खोकला, सर्दी इ. ची लक्षणे असणाऱ्याला स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला जाईल. स्टेडियममधील वांशिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यांविरूद्ध तसेच अपमानास्पद भाषेचा वापर करण्याबद्दल प्रेक्षकांना सावध केले जात आहे. यामुळे खेळामध्ये व्यत्यय येऊ शकतो. नियम मोडणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.''