अहमदाबाद - भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर आटोपला. इंग्लंड संघाची ही भारतातील दुसरी निच्चांकी धावसंख्या ठरली आहे.
भारतीय फिरकीच्या माऱ्यासमोर इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत आटोपला. ही इंग्लंडची भारतातील दुसरी निच्चांकी धावसंख्या ठरली. १९७९-८० या साली इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर होता. या दौऱ्यात मुंबईत झालेल्या सामन्यात इंग्लंडचा संघ १०२ धावांत ऑलआउट झाला होता.
याशिवाय इंग्लंडची भारताविरुद्धची ही चौथी निच्चांकी धावसंख्या आहे. १९७१ साली ओव्हलमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात इंग्लंडचा डाव १०१ धावात आटोपला होता. यानंतर इंग्लंडचा संघ १९८६ मध्ये लीड्स मैदानात १०२ धावांत ऑलआउट झाला होता.
दरम्यान, कर्णधार जो रूटने भारताविरुद्धच्या डे-नाइट कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. सलामीवीर जॅक क्रॉली वगळता इतर एकही फलंदाज भारतीय माऱ्याचा सामना करू शकला नाही.
कर्णधार जो रूट (१७) स्वस्तात बाद झाला. जॅक क्रॉली अर्धशतक (५३) ठोकून माघारी परतला. पाठोपाठ बेन स्टोक्स (६), ओली पोप (१), जोफ्रा आर्चर (११), जॅक लीच (३) आणि स्टुअर्ट ब्रॉड (३) सारेच स्वस्तात बाद झाले. अक्षर पटेलने सर्वाधिक ६ गडी बाद केले. तर अश्विनने ३ गडी बाद करत त्याला साथ दिली. इशांतला एकमात्र गडी टिपता आला.
हेही वाचा - Ind vs Eng ३rd Test : भारताच्या फिरकीसमोर इंग्लंडची शरणागती, 'गल्ली बॉय' अक्षरचे ६ बळी
हेही वाचा - Ind vs Eng ३rd Test : राहुल गांधींचा जुना व्हिडिओ शेअर करत सेहवागने उडवली इंग्लंड संघाची खिल्ली