होवे (इंग्लंड) - भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडवर मात केली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत चार गडी गमावत 148 धावांपर्यंत मजल गाठली होती. भारताकडून शफाली वर्मा हिने 38 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह सर्वाधिक 48 धावा फटकावल्या. कर्णधार हरमनप्रित कौर हिने 25 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारसह 31, स्मृती मनधाना हिने 16 चेंडूंत एक चौकार आणि एका षटकारसह 20, रिचा घोष हिने 9 चेंडूंत एका षटकारसह 8 धावा केल्या. दिप्ती शर्माने 27 चेंडूंत 24 धावा करत नाबाद राहिली. तर स्नेहा राणा ही देखील 5 चेंडूंत एक चौकारह 8 धावांवर नाबाद राहिली. भारताने 20 षटकांत इंग्लंड संघाला 149 धावांचे आव्हान दिले होते. या बदल्यात इंग्लंडचा संघ 140 धावापर्यंतच मजल मारु शकला.
इंग्लंडकडून गोलंदाजी करताना एन. सीवर, एफ. डेविस, साराह ग्लेन आणि मॅडी विलर्स यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. इंग्लंडकडून फलंदाजी करताना टॅमी ब्युमोंटने सर्वाधिक 50 चेंडूंत 7 चौकारांसह 59 धावा केल्या. तर कर्णधार हीदर नाइटने 28 चेंडूंत 30 धावा केल्या. इग्लंडच्या सात फलंदाजांना तर दुहेरी धावसंख्यादेखील गाठता आली नाही.
तर भारताकडून गोलंदाजी करताना पुनम यादव हिने चार षटकांत 17 धावा देत सर्वाधिक दोन बळी घेतले. तर अरुंधती रेड्डी आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. काऊंटी ग्राऊंडवर हा सामना खेळला गेला. दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 ने बरोबरी केली आहे.