नवी दिल्ली - गुजरात क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) सरदार पटेल स्टेडियमवर (मोटेरा) होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यासाठी तिकिटांची विक्री सुरू केली आहे. उभय संघातील तिसरा आणि चौथा कसोटी सामना मोटेरा स्टेडियमवर होणार आहे. यापैकी तिसऱ्या सामन्याची विक्री काल रविवारी ११ वाजल्यापासून सुरू झाली आहे.
जगातील सर्वात मोठे स्टेडियम अशी ओळख बनलेल्या मोटेराची प्रेक्षकसंख्या १ लाख २० हजार इतकी आहे. या सामन्यासाठी प्रशासनाने ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्याची मान्यता दिली आहे. या मैदानावर उभय संघ दोन कसोटी आणि पाच टी-२० सामने खेळणार आहेत. यामध्ये तिसरा कसोटी २४ फेब्रुवारीपासून गुलाबी चेंडूने खेळला जाईल.
मोटेराआधी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदान हे जगातले सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मानले जात होते. मात्र, मेलबर्न आता दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानंतर कोलकाताच्या इडन गार्डन्सचा क्रमांक लागतो. मेलबर्नची आसनव्यवस्था एक लाख असून इडन गार्डन्सची आसनव्यवस्था ६६ हजार इतकी आहे.
जीसीएचे उपाध्यक्ष धनराज नथवाणी म्हणाले की, "या मालिकेचे आयोजन करणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. प्रेक्षकांना येथे सहभागी करून घेण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत. आम्हाला आशा आहे की, लवकरच परिस्थिती सामान्य होईल आणि स्टेडियममध्ये प्रेक्षकांची संपूर्ण उपस्थिती असेल. "