चेन्नई - रोहित शर्माच्या द्विशतकी आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३०० धावा केल्या आहेत. वरच्या फळीचे तीन फलंदाज स्वस्तात गमावल्यानंतर रोहित आणि अजिंक्यने १६२ धावांची भागीदारी रचली. फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर रोहितने आक्रमक पवित्रा धारण करत १६१ धावा तडकावल्या. त्याच्या खेळीत १८ चौकार आणि २ चौकारांचा समावेश होता.
नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर विराटने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. काही सामन्यांपासून उत्तम लयीत असलेला शुबमन गिल आणि रोहित शर्माने सलामी दिली. मात्र, दुसर्या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली स्टोनने गिलला शुन्यावर पायचित पकडले. शुबमननंतर अनुभवी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने डाव सांभाळला. या दोघांनी ८५ धावांची भागीदारी रचली. खेळपट्टीवर स्थिरावू पाहणाऱ्या पुजाराला जॅक लीचने बाद करून भारताला दुसरा धक्का दिला. पुजारा ५८ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. पुजारापाठोपाठ विराट कोहलीली शुन्यावर बाद झाला. फिरकीपटू मोईन अलीच्या वळलेल्या चेंडूवर विराटची दांडी गुल झाली. यानंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना केला.
हेही वाचा - लक्ष्मण म्हणतो, ''वर्ल्डकप जिंकायचा असल्यास विराटने 'या' दोन गोष्टींवर काम करावे''
रोहितने आक्रमक तर, अजिंक्यने संयमी खेळी करत धावफलक हलता ठेवला. रोहितने अवघ्या ४७ चेंडूत नाबाद अर्धशतक झळकावले. त्यानंतर १३० चेंडूत त्याने नाबाद १०० धावाही चोपल्या. शतकी खेळीचे दीडशतकी खेळीत रुपांतर करून रोहित बाद झाला. रोहितपाठोपाठ अजिंक्यदेखील एका धावेच्या अंतराने माघारी परतला. अजिंक्यने १४९ चेंडू खेळून काढत ४ चौकार आणि एका षटकारासह ६७ धावांची खेळी केली. त्याला मोईन अलीने त्रिफळाचित केले. या दोघानंतर रिषभ पंत आणि अश्विनची जोडी मैदानात आली. मात्र, कामचलाऊ गोलंदाज जो रूटने रवीचंद्रन अश्विनला (१३) झेलबाद केले. दिवसअखेर पंत ३३ तर, पदार्पण केलेला अक्षर पटेल ५ धावांवर खेळत होते. पंतने आपल्या खेळीत ५ चौकार आणि एक षटकार लगावला आहे.
इंग्लंडकडून मोईन अली आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी दोन तर, ओली स्टोन आणि जो रूटने प्रत्येकी एक बळी घेतला.
संघ -
इंग्लंड : डोम सिब्ले, रोरी बर्न्स, डॅनियल लॉरेन्स, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फॉक्स, मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच आणि ओली स्टोन.
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज.