चेन्नई - शतकवीर कर्णधार जो रूट आणि सलामीवीर डॉमिनिक सिब्लेच्या अर्धशतकामुळे इंग्लंडने भारतासमोर पहिल्या दिवशी ३ बाद २६३ धावा केल्या आहेत. रोरी बर्न्स (३३) आणि डॅनियल लॉरेन्स (०) बाद झाल्यानंतर रूट आणि सिब्लेने इंग्लंडला सांभाळले. या दोघांनी डावाला आकार देत द्विशतकी भागिदारी रचली. यशाच्या शोधात असलेले टीम इंडियाचे गोलंदाज नामोहरम झाले होते. दिवस संपायला काही अवधी असताना बुमराहने सिब्लेला पायचित पकडले. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून रोरी बर्न्स आणि डॉमनिक सिब्लेने फलंदाजीची सुरुवात केली. या दोघांनीही सुरुवातीला अत्यंत सावध खेळ केला. दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या षटकात बर्न्सला जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक रिषभ पंतकडून जीवदान मिळाले. पहिल्या २० षटकांत भारतीय गोलंदाजांना यश मिळाले नाही. या दोन्ही सलामीवीरांनी २० षटकात इंग्लंडला ५० धावांचा टप्पाही पार करून दिला.
हेही वाचा - आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आर. टी. रामचंद्रन यांचे कोरोनामुळे निधन
त्यानंतर फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने बर्न्सला बाद केले. बर्न्स ६० चेंडूत ३३ धावा करून झेलबाद झाला. त्यानंतर लगेचच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डॅनिएल लॉरेन्सला जसप्रीत बुमराहने पायचित पकडले. लॉरेन्स शुन्यावर बाद झाला. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट आपल्या १००व्या कसोटी सामन्यात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. त्याने सिब्लेला हाताशी धरत धावफलकावर पकड घेण्यास सुरुवात केली. रूटने त्याचे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर आक्रमक खेळ केला. त्याने ७८व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरविरुद्ध खेळताना १६४ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील २०वे शतक ठरले. रूटने १४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १२८ धावांची खेळी केली. तर, सिब्लेने तब्बल २८६ चेंडू खेळून काढत ८७ धावा केल्या. यात त्याच्या १२ चौकारांचा समावेश आहे. शतकाच्या जवळ पोहोचलेल्या सिब्लेला बुमराहने पायचित पकडले. भारताकडून अश्विनने एक तर बुमराहने दोन बळी घेतले.
भारतीय संघ –
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, शाहबाज नदीम.
इंग्लंडचा संघ –
रोरी बर्न्स, डोमिनिक सिब्ले , डॅनियल लॉरेन्स, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर (यष्टिरक्षक), डोमिनिक बेस, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, जेम्स अँडरसन.