चेन्नई - चेपॉक मैदानात सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या डावाची दाणादाण उडाली आहे. भारताच्या ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचे तिसऱ्या दिवसअखेर ५३ धावांत ३ फलंदाज माघारी परतले. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनच्या शतकामुळे भारताने इंग्लंडसमोर विशाल आव्हान ठेवले. इंग्लंडचा संघ अजून ४२९ धावांनी पिछाडीवर आहे. या सामन्याचे अद्याप दोन दिवस बाकी असून फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर इंग्लंडचे उर्वरित फलंदाज आव्हान पेलतात का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
फिरकीपटूंसमोर बिथरले इंग्लंडचे शिलेदार...
दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या इंग्लंडच्या रोरी बर्न्सने इशांत शर्माच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला. मात्र, दुसऱ्या बाजूला असलेल्या डॉमिनिक सिब्लेला फिरकीपटू अक्षर पटेलने पायचित पकडले. सिब्लेने ३ धावा केल्या. त्यानंतर आक्रमक खेळणाऱ्या रोरी बर्न्सला अश्विनने विराटकरवी झेलबाद केले. नाईट वॉचमन म्हणून बढती मिळालेला जॅक लीच शुन्यावर बाद झाला. अक्षरला लीचच्या रुपात दुसरा बळी मिळाला. फिरकीपटूंना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर इंग्लंडचे फलंदाज बिथरताना दिसले. दिवस संपण्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जो रूटला 'अंपायर्स कॉल'मुळे एक जीवदान मिळाले. खेळ थांबला तेव्हा रूट २ तर, डॅनियल लॉरेन्स १९ धावांवर नाबाद होते.
आज तिसऱ्या दिवशी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनने शानदार शतक ठोकले. त्याच्या खेळीमुळे भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद २८६ धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडला विजयासाठी ४८२ धावांचे विशाल आव्हान दिले आहे. दुसऱ्या दिवसअखेर, भारताने शुबमन गिलला गमावत १ बाद ५४ धावा केल्या होत्या. आज सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. मात्र, लीचच्या गोलंदाजीवर पुजारा धावबाद झाला. त्याने ७ धावा केल्या. मागील डावात दीडशतकी खेळी केलेला रोहितही अपयशी ठरला. लीचच्या गोलंदाजीवर रोहित (२६) यष्टिचित झाला. पहिल्या डावात अर्धशतक झळकावलेल्या रिषभ पंतला या डावात बढती मिळाली. पण मोठा फटका खेळण्याच्या नादात तोसुद्धा आपला बळी देऊन बसला. लीचने त्याला वैयक्तिक ८ धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे आणि अक्षर पटेलही स्वस्तात बाद झाले.
हेही वाचा - भारतीय भूमीवर सिराजचा पराक्रम, ८९ वर्षानंतर नोंदवली भन्नाट कामगिरी
विराटचे अर्धशतक तर, अश्विनचे शतक...
भारताची वरची फळी गारद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रवीचंद्रन अश्विनने डावाला आकार दिला. विराटला सुरुवातीला संयमी तर अश्विनने आक्रमक खेळ करत धावफलक हलता ठेवला. या दोघांनी ९६ धावांची भागीदारी केली. भारताने दोनशे धावा पार केल्यानंतर विराट मोईन अलीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ७ चौकारांसह ६२ धावा केल्या. त्यानंतर अश्विनने एक बाजू सांभाळत किल्ला लढवला. भारतीय डावाचा शेवटचा फलंदाज बाकी असताना अश्विनने कसोटीतील पाचवे शतक पूर्ण केले. त्याने आपल्या १०६ धावांच्या खेळीत १४ चौकार आणि एका षटकाराची उधळण केली. तर, सिराज २ षटकारांसह १६ धावांवर नाबाद राहिला. ओली स्टोनने अश्विनची दांडी गुल करत भारतीय डाव संपुष्टात आणला. इंग्लंडकडून मोईन अली आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी ४ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक -
- नाणेफेक - भारत (फलंदाजी)
- भारत पहिला डाव - ३२९/१० (रोहित शर्मा १६१, मोईन अली ४७/३)
- इंग्लंड पहिला डाव - १३४/१० (बेन फोक्स ४२, रवीचंद्रन अश्विन ४३/५)
- भारत दुसरा डाव - २८६/१० (रवीचंद्रन अश्विन १०६, मोईन अली ९८/४)
- इंग्लंड दुसरा डाव - ५३/३* (डॅनियल लॉरेन्स १९*, अक्षर पटेल १५/२*)