चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून (शुक्रवार) सुरूवात होत आहे. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवरती पहिला सामना खेळवला जात आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी खेळाची सुरुवात होईल.
भारतीय संघाने चेन्नईमध्ये आतापर्यंत ३२ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी १४ सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवता आला आहे तर, ६ सामन्यांमध्ये भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले. उर्वरित ११ सामने अनिर्णीत राहिले आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिले दोन सामने चेन्नईत तर राहिलेले दोन सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. दरम्यान, पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्सर पटेल दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडला आहे.
कसोटी मालिकेसाठी भारतीय चमू - विराट कोहली, वृषभ पंत, रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, जसप्रित बुमराह, हार्दिक पंड्या, अक्सर पटेल, केएल राहूल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मयांक अगरवाल, वृद्धीमान साहा.
कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा चमू - जो रूट, जोस बटलर, रोरी बर्नस, डॉमिनीक सिब्ले, डॅनियल लॉरेन्स, बेन स्टोक्स, ओली पोप, मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, क्रिस वॉक्स, बेन फोक्स, ओली स्टोन्स, डॉमिनीक बेस.