नवी दिल्ली - ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगने अनुभवी ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनला इंग्लंडविरूद्ध आगामी एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान देण्यात यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. अश्विन भारताच्या एकदिवसीय संघात असावा का?, असा सवाल एका चाहत्याने हॉगला विचारला होता. त्यावर हॉगने आपली प्रतिक्रिया दिली.
सोशल मीडियावर खूप सक्रिय असणारा हॉग म्हणाला, ''मला वाटते की हा चांगला विचार आहे. यामुळे फलंदाजीत सखोलता येईल. शिवाय, फलंदाजांची वरची फळी अधिक सक्षम होईल. याशिवाय तो गोलंदाजीतही उजवा आहे. त्याची सरासरीही उत्तम आहे. अश्विन एकदिवसीय संघात परतला पाहिजे.''
३४ वर्षीय अश्विनने २०१७मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १११ एकदिवसीय सामन्यांमध्ये अश्विनने ३२.९१च्या सरासरीने आणि ४.८२च्या इकॉनॉमी रेटसह १५० विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी, त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ४/२५ अशी आहे.
इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या २३ एकदिवसीय सामन्यांमध्ये अश्विनच्या खात्यात २८ च्या सरासरीने ३५ बळी आहेत.
हेही वाचा - VIDEO : चौथ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाने नेट्समध्ये गाळला घाम