ओव्हल - भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येत असलेली कसोटी मालिका सद्यघडीला 1-1 अशा बरोबरीत आहे. भारतीय संघाने दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली होती. तेव्हा यजमान इंग्लंड संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा दारूण पराभव करत मालिकेत बरोबरी साधली. उभय संघात उद्या (गुरूवार) पासून चौथ्या कसोटी सामन्याला ओव्हलच्या मैदानावर सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रवी शास्त्री टाइम्स नाउ नवभारतशी बोलताना म्हणाले की, भारतीय संघाने लॉर्डस् कसोटी बाबतीत विचार केला पाहिजे. मागील सामन्यात काय झाले याला विसरलं पाहिजे. पण आपण चांगल्या गोष्टी विसरू नये. खेळात हे सर्व चालत राहतं.
लॉर्डस् क्रिकेट स्टेडियम मधील सामन्यात इंग्लंड संघाचा दबदबा होता. पण आम्ही विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो. मागील कसोटी सामन्याविषयी सांगायचे झाल्यास, लीड्समध्ये इंग्लंडने चांगली गोलंदाजी केली आणि पहिल्या दिवशीच त्यांनी आमच्यावर दबाव निर्माण केला होता. त्या कसोटीत आम्ही पहिल्या दिवशापासून बॅकफूटवर गेलो होतो, अशी कबुली देखील रवी शास्त्री यांनी दिली.
78 धावांत ऑलआउट नंतर दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी -
भारतीय संघ पहिल्या डावात 78 धावांत ऑलआउट झाला. पण दुसऱ्या डावात भारतीय संघाने 278 धावा केल्या. भारतीय संघाच्या या कामगिरीवर रवी शास्त्रींनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, आम्ही दुसऱ्या डावात कडवी झुंज दिली. पण आम्ही सामन्याच्या पहिल्या डावात 78 धावांत ऑलआउट झालो. सामना तिथेच आमच्या हातून निसटला.
पाच सामन्याची कसोटी मालिका बरोबरीत आहे आणि आम्ही विदेशात खेळत आहोत. तरी देखील यजमान इंग्लंडवर प्रेशर आहे. मायदेशात खेळताना त्या देशाच्या संघावर जास्त दबाव असतो. इंग्लंडचा संघ जेव्हा याच वर्षी भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा आम्ही चांगला खेळ करून दाखवला होता, असे देखील रवी शास्त्री यांनी सांगितलं.
हेही वाचा - IND vs ENG : भारतीय संघाने चौथ्या कसोटीसाठी राखीव गोलंदाजाचा संघात केला समावेश
हेही वाचा - PKL Auction : भंडाऱ्याच्या आकाश पिकलमुंडेवर लाखोंची बोली, बंगाल वॉरियर्सकडून खेळणार