मँचेस्टर - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला 10 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघातील एक आणखी स्टाफ मेंबरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे मँचेस्टरमध्ये भारतीय संघाचे सराव सत्र रद्द करण्यात आले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यात येत आहे. भारतीय संघ या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. उभय संघातील अखेरचा सामन्याला उद्या शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यामुळे त्यांना 10 दिवसांसाठी क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला. आता आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समजते. परंतु त्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
भारतीय स्टाफमधील मेंबर कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने अखेरच्या कसोटी बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. बुधवारी भारतीय संघाने सराव केला. पण जेव्हा स्टाफमधील सदस्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली. तेव्हा खेळाडूंना हॉटेलमध्ये परत पाठवण्यात आले. आज गुरूवारी सकाळी पुन्हा खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. याचे अद्याप रिपोर्ट आलेले नाही.
दरम्यान, चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विना प्रशिक्षक खेळला. या सामन्यात भारतीय संघाने 157 धावांनी विजय मिळवला. ओवलमध्ये भारताने 50 वर्षानंतर सामना जिंकला. या सामन्यात रोहित शर्मा सामनावीर ठरला.
हेही वाचा - T-20 World Cup: आर. अश्विनचे भारतीय टी-20 संघात प्रदीर्घ काळानंतर पुनरागमन
हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक : राहुल चहरने कमी कालावधीत निवडकर्त्यांचा जिंकला विश्वास