सिडनी David Warner Quit ODI : ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी घोषणा केलीय. सिडनी क्रिकेट मैदानावर माध्यमांशी संवाद साधताना त्यानं एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती होत असल्याचं सांगितलं. यामुळं नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलिया क्रिकेटला मोठा धक्का बसलाय. डेव्हिड वॉर्नरनं यापुर्वीचं कसोटी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. सिडनी इथं 3 जानेवारीपासून सुरू होणारा पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना आहे.
चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये गरज असल्यास खेळणार : सध्या सुरू असलेली पाकिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका ही कारकिर्दीतील त्याची शेवटची कसोटी मालिका असेल, असं वॉर्नरनं फार पूर्वीच जाहीर केलं होतं. या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाही त्याला विशेष निरोप देण्याची तयारी करतंय. दरम्यान, वॉर्नरनं आता एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची माहिती देऊन सर्वांनाच चकित केलंय. मात्र, त्यानं असंही म्हटलंय की, जर तो दोन वर्षांत T20 क्रिकेट खेळताना पूर्णपणे तंदुरुस्त राहिला आणि ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये त्याची गरज असेल तर तो निश्चितपणे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल.
काय म्हणाला डेव्हिड वॉर्नर : पत्रकार परिषदेत बोलताना वॉर्नर म्हणाला, 'मी निश्चितपणे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. विश्वचषकादरम्यानच मी या गोष्टीचा विचार केला होता. आज मी ठरवलंय की क्रिकेटच्या या प्रकरालाही अलविदा करण्याची वेळ आलीय. या निर्णयानंतर मला जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळण्याची संधी मिळेल. मला माहित आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफी अगदी जवळ आली आहे. येत्या दोन वर्षांत जर मी चांगलं क्रिकेट खेळत राहिलो आणि ऑस्ट्रेलियाला माझी गरज असेल तर मी उपलब्ध असेल, असं वॉर्नर म्हणाला.
डेव्हिड वॉर्नरची एकदिवसीय आणि कसोटी कारकिर्द : डेव्हिड वॉर्नरच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6932 धावा आहेत. त्यानं ऑस्ट्रेलियासाठी 161 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तो दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघाचा भागही होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये डेव्हिड वॉर्नरची फलंदाजीची सरासरी 45.30 आणि 97.26 स्ट्राईक रेट आहे. या प्रकारात त्यानं 22 शतकं झळकावली आहेत. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात अधिक धावा जमा झाल्या आहेत. वॉर्नरनं 111 कसोटी सामन्यात 44.58 च्या सरासरीने 8695 धावा केल्या आहेत. यात त्यानं 26 शतकं झळकावली आहेत.
हेही वाचा :