नवी दिल्ली : आयसीसी विश्वचषक 2023 ला फक्त चार दिवस उरले आहेत. क्रिकेट चाहत्यांसोबतच खेळाडूंचा जोशही दिसून येत आहे. 2023 विश्वचषक भारतात आयोजित केला जात आहे. क्रिकेटमध्ये नेहमीच फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये स्पर्धा असते. कधी-कधी क्रिकेटच्या मैदानावर फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये मारामारीही पाहायला मिळते. आज आम्ही तुम्हाला क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील टॉप 5 गोलंदाजांबद्दल सांगणार आहोत.
क्रिकेट विश्वचषक इतिहासातील सर्वोतम 5 गोलंदाज :
- ग्लेन मॅकग्रा : विश्वचषकाच्या इतिहासातील टॉप 5 गोलंदाजांच्या यादीत पहिलं नाव ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राचं आहे. मॅकग्रानं 1996 ते 2007 दरम्यान 39 विश्वचषक सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं आतापर्यंत विश्वचषकात सर्वाधिक 71 बळी घेतले आहेत. मॅकग्रानं 325.5 षटकांत 3.96 च्या इकॉनॉमीमध्ये 1 हजार 292 धावा दिल्या आहेत. ज्यात 42 षटकांचा समावेश आहे. मॅकग्रानं वर्ल्ड कपमध्ये दोनदा 5 विकेट्स घेतल्या आहेत. मॅकग्राची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 15 धावांत 7 बळी आहे.
- मुथय्या मुरलीधरन : श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन विश्वचषकातील टॉप 5 गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. मुरलीधरननं विश्वचषकात 40 सामन्यांमध्ये भाग घेतलाय. ज्यामध्ये त्याला 39 सामन्यांमध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. मुरलीधरननं 343.3 षटकात 3.88 च्या सरासरीनं 1 हजार 335 धावा दिल्या आहेत. ज्यामध्ये त्यानं 68 विकेट घेतल्या आहेत. मुरलीधरनं विश्वचषक सामन्यांमध्ये 15 ओव्हर टाकल्या आहेत. 19 धावांत 4 बळी ही त्याची विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी आहे.
- लसिथ मलिंगा : विश्वचषकाच्या इतिहासातील टॉप 5 गोलंदाजांच्या यादीत तिसरे नाव आहे श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचं. लसिथ मलिंगानं 2007 ते 2019 या कालावधीत 29 विश्वचषक सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. ज्यामध्ये त्याला फक्त 28 सामन्यात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. लसिथ मलिंगानं वर्ल्ड कपमध्ये 56 विकेट घेतल्या आहेत. मलिंगानं 232.2 षटकात 5.51 च्या इकॉनॉमीसह 1 हजार 281 धावा दिल्या आहेत. ज्यामध्ये त्यानं 11 षटके टाकली आहेत. लसिथ मलिंगानं एकदाच 5 विकेट घेतल्या आहेत. 38 धावांत 6 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
- वसीम अक्रम : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रम विश्वचषकाच्या इतिहासातील टॉप 5 गोलंदाजांमध्ये चौथ्या स्थानावर आहे. 1987 ते 2003 या कालावधीत त्यांनं विश्वचषक क्रिकेट सामन्यांमध्ये भाग घेतला होता. या काळात त्यानं 38 सामने खेळले. ज्यात त्याला केवळ 36 सामन्यांमध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. अक्रमनं 324.3 षटकात 4.04 च्या इकॉनॉमीसह 1 हजार 311 धावा देत 55 विकेट घेतल्या आहेत. वसीम अक्रमनं वर्ल्डकपमध्ये एकदा 5 विकेट्स घेतल्या आहेत. वसीम अक्रमची वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे २८ धावांत ५ बळी.
- मिचेल स्टार्क : ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचं नाव विश्वचषक इतिहासातील टॉप 5 गोलंदाजांमध्ये पाचव्या स्थानावर आहे. मिचेल स्टार्कनं आत्तापर्यंत 2015 आणि 2019 या दोनच विश्वचषकांमध्ये भाग घेतला आहे. तो २०२३ च्या विश्वचषकातील ऑस्ट्रेलियन संघाचा भाग आहे. मिचेल स्टार्कनं 18 सामन्यात 49 विकेट घेतल्या आहेत. त्यानं 156.1 षटकात 4.64 च्या इकॉनॉमीसह 726 धावा दिल्या आहेत. ज्यामध्ये मेडन ओव्हरचा समावेश आहे. मिचेल स्टार्कनं तीन वेळा 5 विकेट घेतल्या आहेत. 28 धावांत 6 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. मिचेल स्टार्क 2023 च्या विश्वचषकाचा एक भाग आहे, त्यामुळं स्टार्क देखील टॉप 5 गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो.
हेही वाचा -