मुंबई Cricket World Cup 2023 : आगामी क्रिकेट वर्ल्डकप जिंकण्यासाठी कोणते संघ प्रबळ दावेदार आहेत? आता हा प्रश्न विचारला तर चाहते भारत, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाचं नावं घेतील. मात्र, पाच दशकांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा प्रत्येकाच्या तोंडी एकच नाव आलं असतं, ते म्हणजे वेस्ट इंडिज! ही कहानी आहे दोन वेळचा विश्वविजेता आणि दोन वेळा टी २० चॅम्पियन असलेल्या कॅरेबियन टीमची, ज्यांना २०२३ च्या विश्वचषकासाठी पात्रता मिळवता आलेली नाही. एकदिवसीय क्रिकेटच्या पाच दशकांच्या इतिहासातील या संघाचा हा सर्वात वाईट टप्पा आहे.
क्रिकेट आणि वेस्ट इंडिज : क्रिकेटच्या मैदानावर पहिला कसोटी सामना १८७७ मध्ये खेळल्या गेला. या खेळाचा जन्म इंग्लंडमधील, त्यामुळे वनडे असो वा कसोटी, सुरवातीच्या काळात क्रिकेटमध्ये फक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचंच वर्चस्व होतं. मात्र या वर्चस्वाला सर्वप्रथम धक्का दिला तो वेस्ट इंडिजनं! या टीमनं जगाला दाखवून दिलं की इंग्रजांचा हा खेळ मनोरंजक आणि रोमांचकही असू शकतो. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजच्या टीम पुढे जगातील सर्व संघानी गुडघे टेकले होते. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमध्ये वसलेली छोटी बेटं मिळून वेस्ट इंडीज नावाचा देश बनतो. ही बेटं जागतिक दर्जाचे खेळाडू आणि चॅम्पियन संघ बनवतात, ज्यांनी खेळामध्ये आपला वेगळा ठसा उमटवलाय.
क्रिकेटच्या शिखरावर : ७० आणि ८० च्या दशकात वेस्ट इंडिजची कामगिरी अविश्वसनीय होती. त्या काळात त्यांनी जे केलं त्याची बरोबरी कोणताही संघ करू शकत नाही. १९७५ च्या पहिल्या वर्ल्डकपमध्ये विंडिजनं सर्व पाच गेम जिंकले. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून कॅरेबियन संघ वर्ल्ड चॅम्पियन बनला. त्यानंतर १९७९ मध्ये त्यांनी सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. जेव्हा ७० च्या दशकात एकदिवसीय क्रिकेटला सुरुवात झाली, तेव्हा वेस्ट इंडिज या फॉरमॅटमध्ये मोठी शक्ती बनला होता. भारतानं १९८३ चा विश्वचषक जिंकला, मात्र तेव्हाही उपविजेता वेस्ट इंडिजचं फेव्हरेट होता. त्याकाळी वेस्ट इंडिजची स्थिती अशी होती की भारताचा विजय म्हणजे जणू काही चमत्कारंच झाला की काय असं वाटायचं.
शिखरापासून तळापर्यंत : मात्र जसजसं ९० चं दशक जवळ आलं, तसतसे एकेकाळचे दिग्गज कॅरेबियन खेळाडू निवृत्त होत गेले. १९९६ चा वर्ल्डकप वगळता, हा संघ त्यानंतर कधीही विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहचू शकला नाही. आता तर २०२३ मध्ये वर्ल्डकपला पात्रता मिळवण्यातही अपयशी ठरल्यानं त्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. तरीही वेस्ट इंडिज संघानं २०१२ आणि २०१६ मध्ये टी २० विश्वचषक जिंकला. तसेच त्यांनी २००४ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली. मात्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये ते आपलं जुनं वैभव परत मिळवू शकले नाही.
वेस्ट इंडिजचे वेगवान गोलंदाज : आजच्या युगात वेगाचा किंवा वेगवान गोलंदाजांचा विचार केला तर ब्रेट ली, शोएब अख्तर, डेल स्टेन, ट्रेंन्ट बोल्ट या गोलंदाजांची नावं चाहत्यांच्या तोंडावर येतात. ताशी १५० किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं चेंडू टाकणारे हे गोलंदाज वेगवेगळ्या संघांकडून खेळले आहेत. पण विचार करा की, एका संघात यांच्यासारखे असे ४ गोलंदाज असतील तर विरोधी फलंदाजांची स्थिती काय होत असेल? मायकेल होल्डिंग, माल्कम मार्शल, अँडी रॉबर्ट्स आणि जोएल गार्नर... आजच्या पिढीला ही नावं कदाचित माहीत नसतील, पण क्रिकेट चाहत्यांच्या आधीच्या पिढ्या यांना बिलकुल अनभिज्ञ नाहीत. या चौकडीनं वेस्ट इंडिजच्या संघाला जागतिक दर्जा प्राप्त करण्यात करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. हे गोलंदाज त्या काळातील फलंदाजांसाठी दहशतीचं दुसरं नाव होते!
वेगवान गोलंदाजांचा दरारा : हा क्रिकेटचा तो काळ होता जेव्हा फक्त फलंदाजाला गोलंदाजाचा वेग जाणवत असे. आजच्या काळाच्या विपरीत, तेव्हा फलंदाजांकडे हेल्मेट किंवा इतर बचावाची साधनं नव्हती. तसेच गोलंदाजांना बाउंसर टाकण्यावरही कोणतेही निर्बंध नव्हते. तेव्हा वेस्ट इंडिजचे हे गोलंदाज फलंदाजांच्या हनुवटीपासून कोपर, बोट, टाच ते बरगड्यापर्यंतच्या प्रत्येक भागावर प्रहार करायचे. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी जगभरातील फलंदाजांना अशा जखमा दिल्या आहेत ज्या कायम त्यांच्यासोबत राहतील. या गोलंदाजांसमोर फलंदाजांना दुखापत होणं हे सामान्य होतं. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची भीती अजूनही अनेक फलंदाजांच्या आत्मचरित्रांचा आणि क्रिकेट कथांचा भाग आहे. या चौकडीची परंपरा नंतर कोर्टनी वॉल्श आणि कोर्टनी अॅम्ब्रोस सारख्या गोलंदाजांनी चालवली. मात्र ९० च्या दशकाच्या अखेरीस या संघाला उतरती कळा लागली आणि वर्ल्ड क्रिकेटच्या क्षितिजावरून हा संघ मागे पडला तो कायमचाच..
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावे आहेत सर्वाधिक धावा, जाणून घ्या कोण आहेत अव्वल पाच फलंदाज
- Cricket World Cup 2023 : रवींद्र जडेजाला बालपणी बनायचं होतं वेगवान गोलंदाज, कोच महेंद्रसिंह चौहान यांचा 'ईटीव्ही भारत' च्या खास मुलाखतीत खुलासा
- Cricket World Cup 2023 : बांग्लादेशच्या 'या' ५ खेळाडूंना अजिबात हलक्यात घेऊ नका, जाणून घ्या कोण आहेत हे खेळाडू