साउथम्पटन - वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने भारताला प्रत्युत्तर देत २ बाद १०१ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने पाच बळी घेत भारताचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली. टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी संघाला दमदार सलामी मिळवून दिली. यानंतर फॉर्मात असलेल्या कॉन्वेने अर्धशतक झळकावत संघाला सुस्थितीत नेले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपायला काही चेंडू शिल्लक असताना कॉन्वे बाद झाला. अंधूक प्रकाशामुळे ३२ मिनिटांचा खेळ होऊ शकला नाही. न्यूझीलंडचा संघ अजून ११६ धावांची पिछाडीवर आहे.
पावसामुळे सामन्याचा पहिला दिवस वाया गेला. तेव्हा दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने भारताला आश्वासक सुरुवात करून दिली. दोघांनी अर्धशतकी सलामी दिली. ६१ धावांवर भारताला रोहितच्या रुपाने पहिला धक्का बसला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमीसनने रोहितला (३४) बाद केले. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या साऊदीने रोहितचा झेल टिपला. रोहित बाद झाल्यानंतर एका धावेच्या फरकाने शुबमन माघारी परतला. नील वॅग्नरने शुबमनला वॉटलिंगकरवी झेलबाद केले. शुबमनने २८ धावा केल्या. या दोघानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सांभाळायचा प्रयत्न केला, पण उपाहारानंतर चेतेश्वर पुजारा (८) बोल्टचा शिकार ठरला.पुजारा बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीने भारताला शंभरीपार नेले. तिसऱ्या सत्रात काही वेळ अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात. काही वेळानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. दरम्यान विराट आणि अजिंक्यने भारतासाठी अर्धशतकी भागिदारी केली. काही षटके खेळल्यानंतर अंधूक प्रकाशामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला. यानंतर खेळ होणार नसल्याचे पंचानी जाहीर केले. दुसऱ्या दिवशी विराट कोहली ४४ तर अजिंक्य २९ धावांवर नाबाद राहिले होते.तिसऱ्या दिवशी पावसामुळे सामन्याला उशिरा सुरूवात झाली. तेव्हा जेमिसनने विराट (४४) पायचित करत भारताला अडचणीत आणले. त्यापाठोपाठ ऋषभ पंत अवघ्या चार धावा काढून बाद झाला. जेमिसनने त्याला लॉथमकडे झेल देण्यास भाग पाडलं. यानंतर वॅग्नरने अजिंक्य रहाणेला चकवलं. ४९ धावांवर त्याचा झेल लॉथमने टिपला. रहाणे बाद झाल्यानंतर भारतीय डावाला गळती लागली. अश्विन (२२), इशांत शर्मा (४), बुमराह (०) आणि जडेजा (१५) ठराविक अंतराने बाद झाले. भारताचा संपूर्ण संघ २१७ धावांवर गारद झाला. जेमिसनने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर बोल्ट आणि वॅग्नरने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. साउथीला एकमात्र गडी बाद करता आला.
काइल जेमिसनने भारतीय डावाला पाडले खिंडार
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला पहिल्या डावात २१७ धावांवर रोखलं आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत भारतीय फलंदाजांवर वेसण घातले. यात काइल जेमिसनने भारतीय डावाला खिंडार पाडले. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात ३१ धावांत ५ गडी टिपले. यासह त्याच्या नावे एका खास विक्रमांची नोंद झाली आहे.
आयसीसीने आयोजित केलेली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा मागील दोन वर्षांपासून खेळवली जात आहे. काइल जेमिसनने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खास विक्रम नोंदवला आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाविरुद्ध पाच बळी घेत या स्पर्धेत तो सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. जेमिसनने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पाचव्यांदा पाच गडी बाद केलेले आहेत. या यादीत त्याने भारताचे फिरकीपटू अश्विन, अक्षर पटेल आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लॉयनला यांना मागे टाकलं आहे. या तिघांच्या नावे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येकी चार वेळा पाच विकेटची नोंद आहे.
न्यूझीलंडचा पहिला डाव
टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीला आणि पहिल्या डावाला सुरुवात केली. त्यांनी बिनबाद ३६ धावा केल्या. लॅथम-कॉन्वे यांनी न्यूझीलंडचे अर्धशतक फलकावर लावले. खेळपट्टीवर स्थिरावलेला न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला अश्विनने माघारी धाडले. लॅथमने ३० धावा केल्या. लॅथम आणि कॉन्वेने पहिल्या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी केली. चांगल्या लयीत असलेल्या डेव्हॉन कॉन्वेने आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने कॉन्वेला माघारी धाडत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. मोहम्मद शमीने कॉन्वेचा झेल टिपला. कॉन्वेने १५३ चेंडूचा सामना करत ६ चौकरांसह ५४ धावांची खेळी केली. त्याच्यानंतर कर्णधार केन विल्यमसनची साथ देण्यासाठी रॉस टेलर मैदानात आला. ४९ षटकानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. न्यूझीलंडने २ बाद १०१ धावा जमवल्या असून ते अजून ११६ धावांची पिछाडीवर आहेत. विल्यमसन १२, तर रॉस टेलर शून्यावर नाबाद राहिला आहे.
न्यूझीलंडचे शतक पूर्ण, कानवे-विल्यमसनची जोडी मैदानात
डेवोन कानवेचे अर्धशतक पूर्ण, सलामीवीर कानवे चिवट खेळी करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याने १३७ चेंडूत अर्धशतक केलं. यात ६ चौकाराचा समावेश आहे.
काइल जेमिसनच्या नावे खास विक्रम
आयसीसीने आयोजित केलेली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा मागील दोन वर्षांपासून खेळवली जात आहे. काइल जेमिसनने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खास विक्रम नोंदवला आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाविरुद्ध पाच बळी घेत या स्पर्धेत तो सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. जेमिसनने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पाचव्यांदा पाच गडी बाद केलेले आहेत. या यादीत त्याने भारताचे फिरकीपटू अश्विन, अक्षर पटेल आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लॉयनला यांना मागे टाकलं आहे. या तिघांच्या नावे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येकी चार वेळा पाच विकेटची नोंद आहे.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारे गोलंदाज -
१) काइल जेमिसन - ५*
२) आर अश्विन - ४
३) नॅथन लॉयन - ४
४) अक्षर पटेल - ४