नॉटिंगहॅम - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लंडने धमाकेदार सुरुवात केल्यानंतर आज त्यांच्यापुढे पाकिस्तानच्या संघाचे आव्हान असणार आहे. ट्रेंट ब्रिजचे मैदान हे मोठी धावसंख्या उभारण्यासाठीचे मैदान म्हणून ओळखले जाते. मागच्या वर्षी याच मैदानावर इंग्लंडने ४८१ ही विश्वविक्रमी धावसंख्या उभारली होती. त्यामुळे आजच्या लढतीत मोठ्या प्रमाणावर धावांची बरसात पाहायला मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजचा सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल.
दुसरीकडे पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजकडून झालेल्या दारुण पराभवानंतर बॅकफूटवर गेला आहे. सलग ११ सामन्यांमध्ये मात खाल्ल्यानंतर आत्मविश्वास उंचावण्याची आज पाकला नामी संधी आहे. शिवाय, इंग्लंडने एकदिवसीय मालिकेत केलेल्या पराभवाचा वचपा आजच्या सामन्यात पाकिस्तान काढणार का हे बघणे रंजक ठरणार आहे.
सामन्यातील प्रमुख आकर्षण -
बेन स्टोक्स -
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात बेन स्टोक्सने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन घडवले होते. त्यामुळे तोच फॉर्म कायम ठेवण्यावर स्टोक्सचे लक्ष असेल.
मोहम्मद आमिर -
शेवटच्या क्षणी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या मोहम्मद आमिरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत चांगले प्रदर्शन केले होते. कमी धावांचे लक्ष राखताना विंडिजचे जे फलंदाज बाद झाले होते ते सर्व आमिरने टिपले होते.
इंग्लंडचा संघ -
- ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, टॉम करन, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.
पाकिस्तानचा संघ -
- सर्फराज अहमद (कर्णधार), बाबर आजम, फखर जमान, इमाम उल हक, हॅरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हफीज, इमाद वसीम, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, शादाब खान, शोएब मलिक आणि वहाब रियाज.