लंडन - आयसीसी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली आहे. भारताने पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विजयी वाटचाल सुरू केली आहे. भारतीय संघाला विश्वकरंडकाच्या उरलेल्या वाटचालीसाठीसुद्धा अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. WWE चॅम्पियन कोफी किंग्सटननेही भारतीय संघाला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. आता विराट कोहलीच्या शाळेने त्याला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विराटला पाठिंबा देण्यासाठी त्याची लहानपणीची शाळा विशाल भारती पब्लिक स्कुलने अनोखा फंडा वापरला आहे. त्याच्या शाळेमधील माती लंडनला पाठवण्यात येत आहे. दिल्लीतील उत्तम नगरमध्ये असलेल्या या शाळेमध्ये विराटने आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
या शाळेमधून विराटने क्रिकेटचा पाया रचला होता. नंतरच्या शिक्षणासाठी तो सेंट सेवियर कॉन्वेंट शाळेत गेला. क्रिकेटमध्ये घेतलेल्या अफाट मेहनतीच्या आधारावर तो यशस्वी झाला.