नवी दिल्ली - भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिलाच विजय साध्य केला. एकीकडे या विजयाचा आनंद साजरा होत असताना दुसरीकडे धोनीच्या खास ग्लोजचा वादही उफाळून आला आहे. सोशल मीडियावर रंगलेल्या या प्रकरणानंतर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया उमटल्या. यासंदर्भात पाकिस्तानी वंशाचे प्रसिद्ध लेखक तारेक फतेह यांनीही ट्विटरवरून आपली भूमिका मांडली आहे.
मैदानात पाकिस्तानी संघाचा नमाज चालतो, तर धोनीने ग्लोज घातल्यास त्यात चुकीचे काय, असा सवाल फतेह यांनी केला आहे. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘आयसीसीने भारतीय संघाचा यष्टीरक्षक लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीला त्याच्या ग्लोजवरुन लष्कराचे सन्मानचिन्ह काढण्यास सांगितले आहे. धोनीने हे ग्लोज वापरले पाहिजेत. यामध्ये बीसीसीआयने धोनीच्या पाठिशी उभे रहायला हवे. विश्वकरंडकात इस्लामिक पद्धतीनुसार दाढी मिशा चालतात. धोनीच्या ग्लोजने कोणालाही अडचण येणार नाही.’
फतेह यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये पाकिस्तान संघाचा एक फोटो ट्विट केला आहे. यात पाकिस्तानचा संघ क्रिकेटच्या मैदानात नमाज पठण करताना दिसत आहे. ‘आयसीसीला पाकिस्तानी संघ मैदानात प्रार्थना (नमाज पठण) करतो याबद्दल काहीच आक्षेप नाही. या प्रार्थनेमध्ये ख्रिस्ती आणि ज्यू लोकांना कमी लेखले जाते. आयसीसीला फक्त धोनीने घातलेल्या ग्लोजवरील बलिदान चिन्हावर आक्षेप आहे.’ असे फतेह यांनी म्हटले आहे.