साऊथहॅम्प्टन - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 'द रोझ बाऊल क्रिकेट मैदानावर एकदिवसीय सामना रंगला होता. दक्षिण आफ्रिकेला नमवत भारताने या स्पर्धेमध्ये विजयाने खाते उघडले आहे. दक्षिण आफ्रिकेवर ६ गडी राखून विजय मिळवला. रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर भारताला विजयाचे लक्ष गाठता आले. त्याने १४४ चेंडुमध्ये १२२ धावा केल्या.
नाबाद शतकी खेळीमुळे रोहित शर्माला सामनावीर किताब देण्यात आला. त्याने १४४ चेंडुत १३ चौकार आणि २ षटकार ठोकत १२२ धावांची धडाकेबाज खेळी केली. या पराभवाने दक्षिण आफ्रिकेची या स्पर्धेतली पराभवाची हॅटट्रीक ठरली आहे. आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने २ तर ख्रिस मॉरीस आणि फेहलुक्वायोने १ बळी घेतला. पंरतु, रोहित शर्माला बाद करण्यात आफ्रिकेला अपयश आले.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २२८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून फिरकीपटू यजुर्वेंद चहलने सर्वाधिक ४ बळी मिळविले. तर बुमराह आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी दोन बळी मिळविले. आफ्रिकेकडून क्रीस मॉरिसने सर्वाधिक (४२), एडिंले फेहलुक्वायोने (३४), कर्णधार फाफ डु प्लेसिसने (३८) तर कगिसो रबाडाने ३१ धावा केल्या. नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. जसप्रीत बुमराहने हाशिम आमला आणि क्विंटन डी-कॉक यांना बाद करत आफ्रिकेला धक्का दिला.
दक्षिण आफ्रिकेच्या २२८ धावांचा पाठलाग करताना भारताने पहिला फलंदाज लवरकर गमावला. शिखर धवन ५ व्या षटकात अवघ्या ८ धावा करुन बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी वाढत असतानाच फेहलुक्वायोनेच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक क्विंटन डि कॉकने विराट कोहलीचा अप्रतिम झेल टिपला. यानंतर लोकेश राहुल आणि रोहितने संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला.
लोकेश राहुल रबाडाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर रोहित शर्माने महेंद्रसिंह धोनीच्या साथीने शतक झळकावले. रोहित शर्माच्या शतकी खेळीने भारताला विजयाच्या समीप आणून ठेवले. विजयास अवघ्या काही धावा शिल्लक असताना धोनी झेलबाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने हार्दिक पांड्याच्या साहाय्याने विजयावर शिक्कामोर्तब केले.