लंडन - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आज पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला विश्वकपमधून 'आऊट' केले आहे. पाकने आफ्रिकेला ४९ धावांनी पराभूत केले. पाकिस्तानच्या ३०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाने ५० षटकामध्ये ९ गड्यांच्या मोबदल्यात २५९ धावा केल्या.
आफ्रिकेच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर हशिम अमला २ धावांवर बाद झाला. क्विंटन डि कॉक आणि कर्णधार डू प्लेसीने आफ्रिकेचा डाव सावरला. डि कॉकने ४७ तर डू प्लेसीने ६३ धावा केल्या. एंडिले फेलुकवायोने शेवटी थोडा प्रतिकार केला पण त्याला अपयश आले. पाकिस्तानकडून वहाब रियाज आणि शाहदाब खान यांनी प्रत्येकी ३, मोहम्मद आमिरने २ तर शाहीन अफरीदीने १ बळी घेतला.
त्यापूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर इमाम उल हक आणि फखर झमान यांनी ८१ धावांची दमदार सलामी दिली. या दोघांनी प्रत्येकी ४४ धावा केल्या. फिरकीपटू इम्रान ताहिरने दोघांना माघारी धाडले. त्यानंतर आलेल्या बाबर आझमने संयमी खेळी करत ६९ धावा केल्या. हॅरिस सोहेलने ५९ चेंडूत ८९ धावांची दमदार खेळी केल्यामुळे पाकिस्तानला ७ गड्यांच्या मोबदल्यात ३०८ धावा करता आल्या.
आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने ३ तर, इम्रान ताहिरने २ बळी घेतले. एंडिले फेलुकवायो आणि एडेन मार्कराम यांना प्रत्येकी १ बळी मिळाला.