मॅनचेस्टर - विश्वचषकात भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळविला. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या संघावर अनेकांनी ताशेरे ओढले होते. सामना संपला असला तरी, मैदानाबाहेरचे भारत - पाक युद्ध अजून संपलेले नाही. भारताचे नवीन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरवरुन भारतीय संघाचे कौतुक करताना 'अजून एक सर्जिकल स्ट्राईक' असा उल्लेख केला होता. त्याला आता पाककडून उत्तर आले आहे.
पाकिस्तान लष्कराचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी अमित शहांना उत्तर दिले आहे. " प्रिय शहा, हो. तुमचा संघ जिंकला. चांगला खेळला. वेगवेगळ्या गोष्टींची तुलना केली जाऊ शकत नाही. त्यामुळे स्ट्राइक आणि या सामन्याची तुलना होऊ शकत नाही. आणि तुम्हाला शंका असेल तर, २७ फेब्रुवारीला हवाई हद्द ओलांडून आम्ही नवशेरामध्ये दिलेल्या उत्तरात भारताची दोन जेट विमाने आम्ही पाडली होती ते बघा. आणि नेहमी चकित होत राहा." असे गफूर यांनी ट्विट केलेल्या उत्तरात म्हटले आहे.
या प्रतिष्ठेच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला नमविल्याने देशातील विविध राजकीय नेत्यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. त्यामध्ये केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू, रेल्वेमंत्री पियूष गोयल, नितीन गडकरी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या नेत्यांचा समावेश आहे.