लंडन - विश्वकरंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात एकदम खराब झाली असून त्यांना मोठमोठ्या धक्क्यांना सामोरे जावे लागत आहे. सलामीच्या सामन्यात इंग्लंडकडून तर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज डेल स्टेन दोन्ही सामन्याला मुकल्यामुळे आफ्रिकेला त्याचा बराच तोटा सहन करावा लागला होता. अशातच आफ्रिकेचा आणखी एक गोलंदाज जखमी झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात जखमी झाला आहे. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असून ५ तारखेला होणाऱया भारताविरुद्धच्या सामन्याला तो मुकणार आहे.
एनगिडीला डाव्या हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. तो एक आठवडा ते १० दिवसांसाठी तो संघाबाहेर असेल. त्यामुळे सध्या त्याला गोलंदाजी करता येणार नाही. परंतू, वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यासाठी तो कदाचित उपलब्ध असेल, असे आफ्रिका संघाचे व्यवस्थापक डॉ. मोहम्मद मुसाजी यांनी सांगितले.
एनगिडीने इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात दमदार प्रदर्शन केले होते. १० षटकांमध्ये त्याने ६६ धावा देत ३ बळी घेतले होते. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मात्र त्याला ४ षटकांत ३४ धावा मोजाव्या लागल्या होत्या.