मॅनचेस्टर- आयसीसी विश्वकरंडकातील सर्वात चर्चेत राहणाऱ्या सामन्यांपैकी एक असणार भारत-पाकिस्तान सामना आज मॅनचेस्टर येथे होणार आहे. विश्वकरंडकाच्या इतिहासात आजपर्यंत दोन्ही संघात ६ लढती झाल्या आहेत. परंतु, भारताने सर्व लढतीत विजय मिळवून आजपर्यंत पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले आहे. आजच्या लढतीत भारत विजयी परंपरा कायम राखण्यासाठी तर, पाकिस्तान भारताविरुद्धच्या पराभवाची मालिका खंडीत करण्यासाठी मैदानात उतरेल.
आजची लढतीत प्रामुख्याने भारताची फलंदाजी आणि पाकिस्तानच्या गोलंदाजीवर सर्वांच्या नजरा असतील. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मोहम्मद आमिरच्या लढतीवर क्रिकेट विश्वाचे लक्ष असणार आहे. २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात एकट्या आमिरने भारताची आघाडीची फळी बाद केली होती. भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माही आमिरच्या गोलंदाजीवर चाचपडताना दिसला आहे. त्यामुळे, आज भारताचे फलंदाज आमिरच्या गोलंदाजीला कसे सामोरे जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आतापर्यंत झालेल्या सामन्यात भारताने चांगली प्रत्येक विभागात चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली यांनी भारताची फलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तिकडीने मिचेल स्टार्क सारख्या गोलंदाजाला चालू दिले नव्हते. आजच्या सामन्यातही मोहम्मद आमिर विरुद्ध फलंदाज याच रणनितीचा वापर करुन मैदानात उतरण्याची शक्यता आहे. भारताच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी संघाला सुरुवातीला विकेट मिळवून दिल्या आहेत. तर, यजुवेंद्र चहल आणि कुलदीप चहल यांनी मिडल ओव्हर्समध्ये संघाला विकेट मिळवून दिल्या आहेत.
विश्वकरंडकात पाकिस्तानची कामगिरी चांगली झाली नाही. संघाला वेस्ट इंडिजकडून पहिल्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. तर, दुसऱ्या सामन्यात त्यांनी विश्वकरंडकाचे दावेदार असलेल्या इंग्लंडला धुळ चारली होती. ऑस्ट्रेलियाला संघाने चांगली टक्कर दिली. परंतु, विजय मिळवण्यास संघाला अपयश आले आहे. पाकिस्तानकडून फलंदाजीत फखर झमान, इमाम उल हक आणि बाबर आझम या खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली आहे. तर, गोलंदाजीत मोहम्मद आमिरने चांगली कामगिरी करताना मोक्याच्या क्षणी संघाला विकेट मिळवून दिल्या आहेत. वाहब रियाझने त्याला चांगली साथ दिली आहे.
विश्वकरंडकात आतापर्यंत भारताने चांगली कामगिरी केली आहे. ३ सामन्यात भारताच्या नावावर २ विजय आणि एक लढत ड्रॉ असे मिळून ५ गुण आहेत. गुणतालिकेत भारत ५ गुणांसह चौथ्यास्थानी आहे. तर, पाकिस्तानचे ४ सामन्यात १ विजय आणि २ पराभव आणि एक ड्रॉ असे मिळून ३ गुण आहेत. पाकिस्तान गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. स्पर्धेत टॉप-४ संघात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने पाकिस्तानला विजय महत्वाचा आहे.
- सामन्याची वेळ - दुपारी ३ वाजता
- स्टेडियम - इमिरेटस ओल्ड ट्रॅफर्ड, मॅनचेस्टर
- भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.
- पाकिस्तान संघ
सर्फराज अहमद (कर्णधार आणि यष्टिरक्षक), इमाम उल-हक, फकर झमान, बाबर आझम, मोहम्मद हाफीझ, शोएब मलिक, असिफ अली, हसन अली, वहाब रियाज, शादाब खान, मोहम्मद आमिर.