नवी दिल्ली - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा सध्या रंजक अवस्थेत आहे. गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर ४८ धावांनी विजय मिळवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. या सामन्यानंतर आयसीसीने बांगलादेशचा खेळाडू सौम्या सरकार आणि फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा 'सख्खे भाऊ' असा संबंध जोडून एक गमतीशीर ट्विट केले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सौम्या सरकार याने गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंच याला बाद करत जल्लोष साजरा केला. आयसीसीला हा जल्लोष क्रिस्टियानो रोनाल्डो जेव्हा गोल करून जल्लोष करतो तसा वाटला. आयसीसीने या दोघांचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये आयसीसीने 'जन्मल्यावर वेगळे झाले?' असा प्रश्न केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशच्या संघाने आश्वासक पद्धतीने गोलंदाजांचा सामना केला, मात्र मोक्याच्या क्षणी गमावलेल्या विकेट आणि योग्य धावगती न राखता आल्यामुळे कांगारुंनी सामन्यात बाजी मारली. बांगलादेशकडून यष्टीरक्षक मुश्फिकूर रहिमने नाबाद शतकी खेळी केली. मात्र, तोही संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.