लंडन - विश्वकरंडकात खेळल्या गेलेल्या रोमांच सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा १५ धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे सर्व प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर स्टीव स्मिथ, अॅलेक्स कॅरी आणि नाथन कुल्टर-नाइल या तिघांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार देत कांगारुंना आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. ऑस्ट्रेलियाला विजय साकारता आला असला तरी फिरकीपटू अॅडम झाम्पाला मात्र आयसीसीने फटकारले आहे.
या सामन्यात आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे झाम्पाला आयसीसीने दोषी ठरवले आहे. आयसीसी आचारसंहितेच्या लेवल- १ आणि कलम २.३ चे उल्लंघन केल्यामुळे झाम्पाला दोषी ठरवले आहे. आयसीसीचे हे कलम आंतरराष्ट्रीय सामन्यात अश्लील शब्द वापरण्यावर बोट ठेवते.
ऑस्ट्रेलियाच्या २८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने दमदार खेळ केला. मात्र, शेवटच्या १० षटकांत वेस्ट इंडिजने योग्य खेळ न केल्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले होते.