नॉटिंगहॅम - विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात पाकने यजमान इंग्लंडवर १४ धावांनी विजय मिळवला. विंडीजच्या वेगवान माऱ्यासमोर हाराकिरी पत्करणाऱ्या पाकिस्तानच्या फलंदाजांनी इंग्लंडसमोर शानदार फलंदाजी केली. फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजीतही उत्कृष्ट मेळ साधल्याने पाकिस्तानला यश प्राप्त करता आले.
या सामन्यात इंग्लंडच्या पराभवाबरोबर आणखी एक गोष्ट घडली. इंग्लंडच्या गोलंदाजीचा 'बाण' म्हणजेच जोफ्रा आर्चर आणि फलंदाज जेसन रॉय यांना ICC ने दंड ठोठावला आहे. सामन्याच्या २७ व्या षटकात जोफ्रा आर्चरने आक्षेपार्ह हावभाव केले. आर्चररला त्याच्या सामन्याच्या मानधनातील १५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.
![jofra archer](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/0521_jofra_archer_0605newsroom_1557126136_982.jpg)
इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉय यालाही ICC च्या कारवाईला सामोरे जावे लागले. सामन्याच्या १४ व्या षटकात इंग्लंडचा खेळाडू जेसन रॉय याने एक चेंडू अडवला. पण त्याच्याकडून चेंडू नीट पद्धतीने अडला नाही. त्यामुळे रॉयने मैदानावर आक्षेपार्ह शब्द वापरला. ICC च्या आचारसंहितेतील पहिल्या स्तराच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे रॉयलाही सामन्याच्या मानधनातील १५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.
![jason roy](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/roy_1805newsroom_1558194857_481.jpg)