लंडन - क्रिकेटचा कुंभमेळा समजल्या जाणाऱ्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा कोण जिंकणार याबद्दल अनेक क्रिकेटपंडितांनी मते व्यक्त केली आहेत. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगचाही आता यात समावेश झाला आहे. मात्र, हरभजने मत व्यक्त केलंय ते भारताचा पांरपारिक शत्रू समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या संघाविषयी.
काही वर्षांपूर्वी पाकिस्तानला हरवणे कठीण होते. पण आत्ताच्या पाकिस्तान संघाला भारत १० पैकी नऊ सामन्यांत पराभूत करू शकतो. पाकिस्तानचा संघ फॉर्मात नाही. शिवाय, कर्णधार सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानकडे अनुभव कमी असल्याने भारताला हरवणे अशक्य आहे, असे ठाम मत भज्जीने व्यक्त केले आहे.
बाकीच्या देशांविरुद्धचे सामने लोकांच्या फार लक्षात राहत नाहीत. पण पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतील प्रत्येक क्षण लक्षात राहतो. भारत हरला तर ते आमच्यासाठी खूप वाईट असेल पण पाकिस्तान जिंकला तर त्यांच्यासाठी बोनस ठरेल. असेही हरभजनने सांगितले.
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लंडने धमाकेदार सुरुवात केल्यानंतर आज त्यांच्यापुढे पाकिस्तानच्या संघाचे आव्हान असणार आहे. सलग ११ सामन्यांमध्ये मात खाल्ल्यानंतर आत्मविश्वास उंचावण्याची आज पाकला नामी संधी आहे. शिवाय, इंग्लंडने एकदिवसीय मालिकेत केलेल्या पराभवाचा वचपा आजच्या सामन्यात पाकिस्तान काढणार का हे बघणे रंजक ठरणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ १६ जूनला पाकिस्तान संघाशी दोन हात करणार आहे.