नवी दिल्ली - आत्तापर्यंत इंग्लंडने एकदाही विश्वकप उंचावला नसला तरी येणारा विश्वकप इंग्लंडच्या पदरी पडू शकतो. आजवर इंग्लंडच्या अनेक संघांपैकी ईऑन मॉर्गनच्या नेतृत्त्वाखालील सध्याचा इंग्लंड संघ हा, आतापर्यंतचा सर्वाधिक मजबूत संघ आहे, असे मत अनेक क्रिकेट जाणकारांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सध्याच्या इंग्लंड संघ आणि त्यांचा फॉर्म बघता इंग्लंडला ही स्पर्धा जिंकणे अवघड जाणार नाही.
पाकिस्तानविरुद्ध नुकत्याच खेळल्या गेलेल्या मालिकेत इंग्लंडने दमदार प्रदर्शन केले होते. ५ सामन्यांची वनडे मालिका ४-० ने आपल्या नावावर करत पाकिस्तानचा सुपडा साफ केला. तसेच ३५० धावांचे आव्हान इंग्लंडने सहजरित्या पूर्ण केले होते. त्यामुळे मोठ्या आव्हानांचा पाठलाग करणे इंग्लंडला कठिण जाणार नाही.
वनडेमधील सर्वाधिक धावसंख्या इंग्लंडच्या नावावर
19 जून 2018 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खेळल्या गेलेल्या वनडेत इंग्लंडने ४८१ धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळे हा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलागही करु शकतो.
फलंदाजांची मजबूत फळी
इंग्लंडच्या संघामध्ये अगदी तळापर्यंत फलंदाजांची मजबूत फळी पाहायला मिळते. मैदानावर तळ ठोकून आतषबाजी करणारे फलंदाजही इंग्लंडकडे आहेत. जेसन रॉय, कॅप्टन ईऑन मॉर्गन, जो रूट, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो असे सर्वच फलंदाज फॉर्मात आहेत.
पाकिस्तानला पछाडले
पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेत जेसन रॉयने सर्वाधिक धावा बनवल्या होत्या. ३ वनडेमध्ये त्याने २७७ धावा केत्या. या मालिकेत जॉनी बेअरस्टोसुद्धा चमकला होता.त्याने ३ वनडेत २११ धावा जमवल्या होत्या. रुटने सामन्यातील ४ इनिंग्जमध्ये २०३ तर मॉर्गन आणि बटलर यांनी ३ इनिंग्जमध्ये अनुक्रमे १६४ आणि १४४ धावा बनवल्या होत्या.
अनस्टॉपेबल जॉनी बेअरस्टो
यंदाच्या आयपीएल हंगामात सनराइजर्स हैद्राबाद संघाकडून खेळताना बेअरस्टोने धावांची बरसात केली होती. इंग्लंडच्या संघाची खासियत म्हणजे प्रत्येक फलंदाज २५ चेंडूत ५० धावा बनवण्याची क्षमता ठेऊ शकतो.
सामन्याचे चित्र पालटणारा संघ
इंग्लंडच्या संघामध्ये एकता आहे हा संघ कोणा एका खेळाडूवर अवलंबून नाही. बेन स्टोक्स आणि मोईन अली सारखे अष्टपैलू खेळाडू या संघात आहेत. फिरकी गोलंदाजीस उपयुक्त ठरणाऱ्या पिचेसवर मोईन अली प्रभावी ठरू शकतो.
जोफ्रा आर्चरला मिळाली विश्वकपमध्ये संधी
या स्पर्धेत डावखुरा तेज गोलंदाज डेव्हिड विलीच्या जागी जोफ्रा आर्चरला संधी मिळाली आहे. मंगळवारी इंग्लंडच्या संघात हा बदल करण्यात आला. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत आर्चरने चांगली कामगिरी केली होती. आणि त्यामुळे आर्चरचा समावेश संघात केला.
चांगल्या गोलंदाजांचा ताफा
युवा जोफ्रा आर्चर आपल्या तेज गोलंदाजीने फलंदाजांची भंबेरी उडवू शकतो. याशिवाय लियाम प्लंकेट, क्रिस वोक्स, मार्क वुड, टॉम करन सारखे अनुभवी गोलंदाजही संघात आहेत.
विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडचा संघ
ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, टॉम करन, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.