ठाणे - इंग्लंडमध्ये दिव्यांगांसाठी होणाऱ्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार आहे. भारताचे दिवंगत माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या संस्थेतर्फे या टीम इंडियाला शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यातील विव्हियाना मॉलमध्ये एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात दिव्यांगांचा भारतीय संघ या कार्यक्रमाला उपस्थित होता.
ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी भारतीय क्रिकेट संघाला तमाम ठाणेकरांतर्फे शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी अजित वाडेकर यांची कन्या काश्मिरा वाडेकर या उपस्थित होत्या. दिव्यांगांच्या भारतीय संघात काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या अनेक राज्यातील दिव्यांग खेळाडू सामील झाले असून विश्वकरंडक उंचावण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे.
या स्पर्धेसाठी हा संघ ऑगस्टमध्ये इंग्लंडला रवाना होणार आहे. दिवंगत माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या अनेक वर्षाचे स्वप्न साकार होण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील राहणार आहे. 2018 च्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानवर 2 विकेट्सने मात केली होती.