नॉटिंगहॅम - विश्वकरंडकात खेळल्या गेलेल्या रोमांचकारी सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा १५ धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर २८९ धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाचे सर्व प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर स्टीव स्मिथ, अॅलेक्स कॅरी आणि नथन कुल्टर-नाइल या तिघांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार देत कांगारुंना आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. ऑस्ट्रेलियाच्या २८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने दमदार खेळ केला. मात्र, शेवटच्या १० षटकांत वेस्ट इंडिजने योग्य खेळ न केल्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले.
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून विक्रम पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या झालेल्या सामन्यातही एक विक्रम पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज म्हणून ओळख असलेल्या नॅथन कुल्टर-नाईलने फलंदाजीत चांगला नजराणा पेश करत वन डे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. नॅथनने आक्रमक फटकेबाजी करत ६० चेंडूत ९२ धावा केल्या. या त्याने खेळीत ८ चौकार आणि ४ षटकारा लगावले.
नॅथनने केलेल्या अर्धशतकाबरोबर एक विक्रम मोडीत काढला. विश्वकरंडकात ८व्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाने केलेली ही सर्वाधिक धावसंख्या ठरली. यापूर्वी २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत झिम्बाबवेच्या हिथ स्ट्रीकने न्यूझीलंड विरुद्ध ८४ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी केली होती. तो विक्रम कुल्टर-नाईलने मोडीत काढला आहे.