नवी दिल्ली - विश्व करंडक स्पर्धेत भारत व पाकिस्तानमध्ये रविवारी मँचेस्टर येथे सामना खेळला जाणार आहे. हा सामना कोण जिंकणार याची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे. अशा स्थितीत सट्टा बाजाराच्या गोरखधंद्याने १०० कोटींचा टप्पा दिल्ली परिसरात ओलांडला आहे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा आणि गुरुग्राम या भागात सट्टेबाजांचे नेटवर्क मजबूत असल्याचे मानले जाते. याबाबत पोलीस उपायुक्त मधुर वर्मा माध्यमांशी बोलताना म्हणाले, रविवारी भारत-पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्यावर नजर असणार आहे. प्रत्येक मार्गाने आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. पाच सितारा हॉटेल, गेस्ट हाऊस, विशेषत: करोल बाग आणि पुरानी दिल्लीच्या परिसरात लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. कारण या परिसरात बडे सट्टेबाज आहेत. या सट्टेबाजांचे नेटवर्क मजबूत असल्याने त्यांना पकडणे कठीण आहे. तरी आम्ही आमचे काम करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला पोलिसांनी उत्तर दिल्लीमधून बड्या सट्टेबाजांना पकडले होते. त्यांच्याजवळ फोनशी जोडण्यात येणारे इंटरनेट सॉफ्टवेअर अशी त्यांनी माहिती दिली.
सट्टेबाजानुसार भारताचे पारडे जड-
सामना कोण जिंकणार याबाबत क्रिकेटचे चाहते व माजी खेळाडू वेगवेगळा अंदाज वर्तवितात. सट्टेबाजारातील कौलानुसार भारताचे पारडे जड आहे. सट्टा केवळ पूर्ण सामन्यावर खेळला जात नाही. तर षटक, एक-एक चेंडू, कोण किती धावा काढणार, कोण किती गडी बाद करणार यावरही सट्टा लावण्यात येतो. सट्टेबाजाने सांगितले की, आयएपीएल सामन्याप्रमाणेच विश्वकरंडकासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यावसायिक, हॉटेल मालक, किक्रेट चाहते, व्यापारी, कॉर्पोरेट महिला, हवाला व्यावसायिक सट्टा लावतात. ६० टक्क्याहून अधिक लोकांनी भारताच्या विजयावर सट्टा लावला आहे. सूत्राच्या माहितीनुसार भारतीय खेळाडूंच्या भावावरून सट्टेबाजारातील भाव निश्चित करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ जसप्रीत बुमराहसाठी १५ रुपये आणि मोहम्मद आमिरसाठी ६ रुपये असा भाव आहे.
कोणता खेळाडू अर्धशतक करणार कोणता खेळाडू शतक करणार यावरही सट्टा लावण्यात आला आहे. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा आणि पाकिस्तानच्या बाबर आझम तथा फखर जमान यांच्याव सट्टा लावण्यासाठी पसंती देण्यात येत आहे.
सट्टेबाजारांचे अंडरवर्ल्डशी संबंध-
यापूर्वी सट्टेबाजारांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे उघडकीस आले आहे. तर काही बुकी हे मॅच फॅक्सिंग करतात,असेही आढळून आले आहे. भारतात सट्टा लावायला बंदी असली तरी काही देशात कायदेशीर परवानगी आहे.