इस्लामाबाद - हरारे येथील भारतीय उच्चायुक्तांच्या विनंतीवरून झिम्बाब्वे क्रिकेटने (झेडसी) राष्ट्रीय प्रशिक्षक आणि माजी भारतीय क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांना पाकिस्तान दौर्यावर पाठवले नाही. मंगळवारी झिम्बाब्वे क्रिकेट संघ पाकिस्तानला पोहोचला.

यापूर्वी पाकिस्तानी उच्चायोगाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी राजपूत यांना व्हिसा दिला होता. राजपूत यांना पाकिस्तानी उच्चायोगाने परवानगी दिली होती. मात्र, भारतीय उच्चायोगाने तिथे न जाण्यासंदर्भात अपील केल्याचे, झिम्बाब्वे क्रिकेटने सांगितले. राजपूत यांच्या अनुपस्थितीत गोलंदाजी प्रशिक्षक डग्लस होंडो पाकिस्तान दौर्यावर मुख्य प्रशिक्षकाची भूमिका साकारतील.
मालिकेच्या वेळापत्रकानुसार, झिम्बाब्वेचा संघ ३० ऑक्टोबर, १ नोव्हेंबर आणि ३ नोव्हेंबरला रावळपिंडी येथे एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका वर्ल्डकप सुपर लीगचा एक भाग आहे. त्यानंतर उभय संघांत ७, ८ आणि १० नोव्हेंबरला लाहोरमध्ये टी-२० सामने खेळले जाणार आहेत.
भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक राजपूत मे २०१८मध्ये झिम्बाब्वेचे हंगामी मुख्य प्रशिक्षक बनले. त्यानंतर, ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती झाली.