हैदराबाद - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेला आज शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेच्या माध्यमातून भारतीय संघ आगामी विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. आजच्या सामन्यात भारताचा आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला रवीचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराहला मागे टाकण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
हेही वाचा - INDvsWI १st t20 : हैदराबादमध्ये 'धूमशान' घालण्यासाठी दोन्ही संघ सज्ज
या सामन्यात चहलने ३ गडी बाद केले तर, तो आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये चहलच्या नावावर ५० बळी आहेत. तर, ५२ बळींसह फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन पहिल्या आणि ५१ बळींसह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे.
२०१७ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात चहलने सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले होते. त्याने २५ धावा देत ६ बळी घेण्याची किमया केली होती. या सामन्यात भारताने इंग्लंडचा ७५ धावांनी पराभव केला होता. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पाच बळी घेणारा चहल हा भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे.