मुंबई - भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगने भविष्यात प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी खेळाडूंच्या मानसिकतेवर काम करू शकतो, असे युवराज म्हणाला. पीटरसनसमवेत इन्स्टाग्रामवर बोलताना युवराजने आपली प्रतिक्रिया दिली.
युवराज म्हणाला, "मी प्रशिक्षकापासून सुरुवात करू शकतो. समालोचकापेक्षा कोचिंगमध्ये मला अधिक रस आहे. मर्यादित षटकांबद्दल मला अधिक माहिती आहे. त्यामुळे मी माझा अनुभव सांगू शकेन." गेल्या वर्षी आपल्या क्रिकेट कारकिर्दीला निरोप देणाऱ्या युवराजने काही दिवसांपूर्वी म्हटले होते, की भारतीय संघाला मानसतज्ञाची आवश्यक आहे.
युवराज म्हणाला, "मी कदाचित एक मार्गदर्शक म्हणून सुरूवात करू शकतो. पूर्ण वेळ प्रशिक्षकाची संधी मिळाली तर तेही करेन." यावेळी इंग्लंडचा माजी कर्णधार पीटरसनने युवराजला समालोचन करायला सांगितले होते.
या विषयावर युवराज "मी एका वर्षाचा ब्रेक घेईन. ज्या चांगल्या स्पर्धा असतील त्यापैकी काही मी खेळू शकतो. मी तुमच्याबरोबर येईन आणि समालोचन शिकून घेईन. या क्षेत्राचा मला अभ्यास नाही."