नवी दिल्ली - क्रिकेटची १७ वर्षे सेवा केलेला भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंगने १० जून २०१९ रोजी क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्तीची घोषणा केली. यंदाच्या आयपीएलमध्येही युवराजला स्थान मिळालेले नाही. मात्र एका वृत्तानुसार, तो आता पुनरागमनाच्या प्रतीक्षेत आहे.
एका वर्षानंतर युवराजने पुन्हा मैदानात परतण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी त्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला एक पत्रही लिहिले आहे. ३८ वर्षीय युवराजने पंजाब संघात पुनरागमन करून क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूपात पंजाबकडून खेळता येईल, असे संकेत दिले आहेत. सध्या युवराज पंजाबमधील युवा क्रिकेटपटूंबरोबर बराच वेळ घालवत आहे.
तत्पूर्वी, लॉकडाऊन दरम्यान युवराज सिंग पंजाबच्या चार खेळाडूंसाठी (शुबमन गिल, प्रभासिमरन सिंग, अभिषेक शर्मा आणि अनमोलप्रीत सिंग) मार्गदर्शक ठरला. आयपीएलच्या तयारीसाठी या खेळाडूंना युवराजने घरी बोलावून प्रशिक्षणही दिले. पंजाब संघातील खेळाडूंसाठी युवराज मार्गदर्शक म्हणून समोर आला.
बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) खेळणारा पहिला भारतीय खेळाडू होण्यासाठीसुद्धा युवराज सिंग प्रयत्नशील आहे. ऑस्ट्रेलियाच्या या प्रसिद्ध लीगमध्ये खेळण्यासाठी युवराज क्लबच्या शोधात आहे. शिवाय, यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) त्याला मदत करत असल्याचेही वृत्त आहे. त्याने ग्लोबल टी-२० लीग आणि अबु धाबी टी-१० लीगमध्ये भाग घेतला होता.
युवराजने भारताकडून ३०४ एकदिवसीय सामने, ४० कसोटी आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे ८७०१, १९००, ११७७ धावा केल्या आहेत.