नवी दिल्ली - टीम इंडियाचा विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात पराभव झाला. यानंतर संघ निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. गांगुली लक्ष्मण यांच्यासह अनेक दिग्गजांनी निवड समितीला धारेवर धरले. आता त्यात भर पडली असून भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह हाही निवड समितीवर भडकला आहे.
निवड समितीने अंबाती रायडूला योग्य वागणूक दिली नसल्याचे युवराजने सांगितले. भारतीय संघात चौथ्या नंबरचा फलंदाज यावरुन विश्वकरंडक स्पर्धेत आधीपासून चर्चा होती. यामध्ये अंबाती रायडू हा चांगला विकल्प असल्याचेही बोलले जात होते. मात्र अंबाती रायडूची संघात निवड करण्यात आली नाही. अंबातीच्या ठिकाणी नवख्या अष्टपैलू विजय शंकरला संघात संधी देण्यात आली आणि अंबातीला स्टँन्डबाय खेळाडू म्हणून ठेवण्यात आले.
शिखर धवनला स्पर्धेत दुखापत झाली आणि तो त्या दुखापतीमुळे स्पर्धेला मुकला. त्यानंतर विजय शंकरला संघात स्थान मिळाले. मात्र, त्यालाही स्पर्धेत दुखापत झाली आणि तोही स्पर्धेबाहेर गेला. असे असताना, स्टँन्डबायवर असलेल्या अंबातीची संघात निवड करण्यात आली नाही. तेव्हा अंबातीने निवृत्ती स्वीकारली.
'या' कारणाने भारताचा पराभव झाला -
अंबाती रायडू मागील काही सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरला याचा अर्थ तो पुढील सामन्यात धावा जमवू शकत नाही. असे होत नाही. संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही. यामुळे भारताला पराभूत व्हावे लागले. त्याच्या ठिकाणी नवख्या ऋषभ पंतला संधी देण्यात आली. असे युवराज म्हणाला.