साउथम्प्टन - इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटीतील मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने पाकिस्तानविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत कर्णधार अझर अलीला बाद करत कसोटीत ६०० बळी पूर्ण केले. या कामगिरीसाठी संपूर्ण क्रिकेटविश्वाने अँडरसनला शुभेच्छा दिल्या. भारताचा युवराज सिंग आणि जसप्रीत बुमराहनेदेखील अँडरसनचे अभिनंदन केले.
''जेम्स अँडरसन, जबरदस्त कामगिरीबद्दल तुझे अभिनंदन! तुझे क्रिकेटसाठीचे प्रेम, धैर्य आणि निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. भविष्यासाठी तुला शुभेच्छा!'', असे बुमराहने '६०० कसोटी बळी' हा हॅशटॅगचा जोडत ट्विटरवर म्हटले. बुमराहच्या अभिनंदनाच्या संदेशावर युवराजने त्याला एक चॅलेंज दिले आहे. ''तू कसोटीत किमान ४०० बळी घे”, असे युवराजने ट्विट केले.
जसप्रीत बुमराहच्या नावावर सध्या १४ कसोटी सामन्यांमध्ये ६८ बळी जमा आहेत. तर, २७ धावांत ६ बळी ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. कसोटीमध्ये ६०० बळींची कामगिरी करणारा अँडरसन हा पहिलाच जलदगती गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी केवळ फिरकीपटू गोलंदाजांनाच ही कामगिरी करता आली आहे. १५६ कसोटी सामन्यांमध्ये खेळल्यानंतर तो '६०० विकेट्स क्लब'मध्ये पोहोचला आहे.