नवी दिल्ली - माजी क्रिकेटपटू योगराज सिंग आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. नवीन शेतीविषयक कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी भडकाऊ भाषण केले आहे. योगराज यांनी या भाषणात हिंदूंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.
हेही वाचा - चहलला संघात घेऊन टीम इंडियाने रडीचा डाव खेळला?
शेतकरी आंदोलनादरम्यान योगराज सिंग यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल माध्यमात प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये योगराज सिंग 'हिंदूंना गद्दार' म्हणत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी महिलांबद्दलही वादग्रस्त विधान केले आहे. अनेकांनी योगराज यांच्या भाषणाला निंदनीय, दाहक, अपमानजनक आणि द्वेषपूर्ण म्हटले आहे. योगराज यांचे हे वक्तव्य पंजाबी भाषेत आहे. काही वर्षांपूर्वी, युवराज सिंगला संघात स्थान न मिळाल्याने योगराज यांनी महेंद्रसिंह धोनीबद्दल वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला होता.
दिल्ली सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी नवीन कृषी कायद्याविरोधात आवाज उठवत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलने होत असून क्रिकेटपासून बॉलिवूडपर्यंत दिग्गज व्यक्ती शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहेत.
ब्रिटनमधील ३६ खासदारांचा आंदोलनाला पाठिंबा -
भारतातील या शेतकरी आंदोलनाला ब्रिटनमधील ३६ खासदारांनी पाठिंबा दिला आहे. लेबर पार्टीचे खासदार तनमनजीत सिंग धेसी यांच्या नेतृत्वाखाली ३६ ब्रिटिश खासदारांनी युकेचे सचिव डोमिनिक राब यांना याबाबत पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी कृषी कायद्यांविरोधात भारतावर दबाव टाकण्याची मागणी केली आहे.