मुंबई - भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंगने मुंबईत पत्रकार परिषद घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. युवराजने ३ ऑक्टोबर २००३ साली एकदिवसीय क्रिकेटद्वारे भारताच्या संघात पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने भारताकडून ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय आणि ५८ टी-ट्वेन्टी सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.
निवृत्तीबद्दल बोलताना युवराज म्हणाला, जवळपास २५ वर्ष मी २२ यार्डाच्या खेळपट्टीवर खेळत आहे. यापैकी १७ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मी चढ-उतार पाहिले आहेत. आता मी पुढे जायचे ठरवले आहे. कशाप्रकारे सगळी मरगळ दुर करुन उठून पुन्हा मला लढायला या खेळाने शिकवले आहे.
युवराज सिंगने भारताला २००७ साली झालेला टी-ट्वेन्टी विश्वकरंडक आणि २०११ साली झालेला एकदिवसीय विश्वकरंडक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. २००७ साली त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात लगावलेले ६ षटकार आजही क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहेत. क्रिकेट कारकिर्दीत युवराजने अनेक विक्रम त्याच्या नावावर केले आहेत. आजही त्याचे काही विक्रम कोणी मोडू शकले नाही.
२०११ साली झालेल्या विश्वकरंडक विजयानंतर युवराजला कॅन्सरचे निदान झाले होते. युवराजने कॅन्सरशी यशस्वी लढा देत दिमाखात पुनरागमन केले होते. युवराजने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ३०४ सामने खेळताना ३५.५६ च्या सरासरीने ८ हजार ७०१ धावा केल्या आहेत. तर, १११ विकेट्सही त्याने घेतल्या आहेत. कसोटी कारकिर्दीत त्याने ४० सामने खेळताना ३३.९३ च्या सरासरीने १ हजार ९०० धावा त्याने केल्या आहेत. तर, ९ गडीही त्याने बाद केले आहेत. भारतासाठी टी-ट्वेन्टी सामन्यातील हुकमी एक्का म्हणून ओळखल्या जाणाऱया युवराजने ५८ सामने खेळताना २८.०२ च्या सरासरीने १ हजार १७७ धावा केल्या आहेत. तर, २८ गडीही त्याने बाद केले आहेत.
आयपीएल कारकिर्दीत युवराजने चमकदार कामगिरी करताना १३२ सामने खेळले आहेत. यात त्याने २ हजार ७५० धावा केल्या आहेत. तर, ३६ गडीही बाद केले आहेत. आयपीएलच्या लिलावात त्याच्यावर १६ कोटींपर्यत बोली लागली होती.