नवी दिल्ली - भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिगंने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन युवीने निवृत्तीची घोषणा केली. युवराजने आपल्या १९ वर्षांच्या मोठ्या कारकिर्दीला आज पूर्णविराम दिला. निवृत्तीच्या घोषणेवेळी तो खूपच भावूक झाला होता.
यावेळी युवराजला तुझ्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत कुणाचा सल्ला घेतला का? असा प्रश्न विचारला असता, यावर युवी म्हणाला, जहीर खान, आशिष नेहरा, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर हे माझे बेंच खेळाडू आहेत. निवृत्तीविषयी मी सचिनला विचारले असता यावर सचिन म्हणाला, हा निर्णय तुझा आहे, ना कुणा दुसऱ्याचा. त्यानंतर युवराजने निवृत्तीचा निर्णय घेतला. युवराजने सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये आपल्या १९ वर्षाच्या कारकीर्दीमधील काही रंजक गोष्टी सांगितल्या. क्रिकेटच्या प्रवासातील काही किस्से सांगताना तो भावूक झाला होता. यावेळी तो म्हणाला, क्रिकेटने मला लढणे, पडणे, पुन्हा उठणे, आणि पुढे जाणे शिकवले आहे. यावेळी युवीने कर्करोगाबाबत डॉक्टरांचे आभार मानले.
युवराजने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३०४ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात ८ हजार ७०१ धावा केल्या आहेत. यामध्ये १४ शतके असून ५२ अर्धशतके ठोकली आहेत. १५० ही त्याची सर्वाधिक वैयक्तीक धावसंख्या आहे. गोलंदाजीत त्याने १६१ सामन्यात १११ बळी घेतले. युवीने एकदा ५ बळी घेण्याचाही पराक्रम केला आहे. याशिवाय ५१ आतंरराष्ट्रीय टी-२० सामन्यात १ हजार १७७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २८ बळीही घेतले आहेत.