लाहोर - कर्णधारपदाच्या काळात सत्य बोलत होतो. त्यामुळे मला वेडे ठरवले गेले, असे पाकिस्तानचा माजी कर्णधार युनिस खानने म्हटले आहे. युनिसने तत्कालिन पाकिस्तानच्या संघसहकाऱ्यांवर वागणुकीवरून ताशेरे ओढले आहेत.
युनिसचा पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये समावेश आहे. कसोटीत तो देशासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. जेव्हा खेळाडूंना देशासाठी शंभर टक्के योगदान द्यायला सांगायचो तेव्हा काही खेळाडूंना मी आवडत नव्हतो, असे युनिसने सांगितले.
युनिस म्हणाला, “तुमच्या आयुष्यात बर्याचदा अशी परिस्थिती येते जेव्हा तुम्ही सत्य सांगितले तर तुम्हाला वेडे समजले जाते. देशासाठी कठोर परिश्रम घेत नसल्याचे मी खेळाडूंना सांगितले होते आणि ही माझी चूक होती.''
तो म्हणाला, "त्या खेळाडूंना नंतर मात्र याची खंत वाटली आणि आम्ही पुन्हा बराच काळ देशासाठी एकत्र खेळलो. मला माहित आहे की मी काहीही चूक केली नाही. माझ्या वडिलांकडून मी सत्य बोलणे शिकलो आहे."