मुंबई - प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय युवा संघाने उपांत्य फेरीत पाकिस्तानचा १० गडी राखून फाडशा पाडत अंतिम फेरीत धडक मारली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हिरो ठरला मुंबईचा यशस्वी जैस्वाल. त्याने या सामन्यात ११३ चेंडूत नाबाद १०५ धावांची खेळी केली. या खेळीसाठी यशस्वीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, यशस्वीचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने बातचित केली. तेव्हा त्यांनी यशस्वीचा प्रवास सांगितला. पाहा ज्वाला सिंग काय म्हणतायेत यशस्वीच्या कामगिरीबद्दल...
कोण आहे यशस्वी जैस्वाल -
यशस्वी जैस्वाल मूळचा उत्तर प्रदेशातील भदोही गावचा. त्याच्या वडिलांचे गावाकडे एक लहानसे दुकान आहे. क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुंबईला आला. मुंबईत तो त्याच्या काकांकडे रहायचा. घर छोटे असल्याने त्याला तिथे राहणे अवघड जायचे. तेव्हा त्याच्या काकांनी मुस्लीम युनायटेड क्लबच्या मालकांकडे यशस्वीला क्लबमध्ये रहायला देण्याची विनंती केली. त्यानंतर यशस्वी क्लबच्या तंबूत तीन वर्ष राहिला. तो डिसेंबर २०१९ महिन्यामध्ये आयपीएलच्या लिलावत मोठी बोली लागल्याने चर्चेत आला.
मुस्लीम युनायटेड क्लबच्या तंबूत ग्राऊंड्समनसोबत राहत असताना यशस्वी एका डेअरी शॉपमध्ये काम करत होता. क्रिकेट खेळण्याने आलेल्या थकव्यामुळे त्याला कामावर झोप येत असे. यामुळे त्याला मालकाने कामावरुन काढून टाकले. पण त्याने हे त्याच्या घरच्यांना कधीच कळू दिले नाही.
यशस्वीचे वडील मुंबईला पैसे पाठवत होते. पण ते पुरेसे नव्हते. म्हणून त्याला उदरनिर्वाह करण्यासाठी आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी विक्रीचा व्यवसायही करावा लागला. २०१३ मध्ये प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी त्याच्यातील कौशल्य ओळखले आणि त्याला आपल्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे देण्यास सुरूवात केली. तेव्हापासूनच त्याने उत्तुंग भरारी घेतली.
हेही वाचा - IND vs NZ : टीम इंडियाला 'ही' चूक भोवली, बुमराह, शार्दुल ठरले खलनायक
हेही वाचा - २००७ ची पुनरावृत्ती, किवींने ३४७ धावांचे आव्हान केले होते पार, वाचा नेटिझन्सच्या प्रतिक्रिया