नवी दिल्ली - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीचा सामना न्यूझीलंड विरुध्द होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी कर्णधार विराटने न्यूझीलंडच्या संघाला उपांत्य फेरीत धुळ चारली होती. होय हे खरे आहे. विराटने २००८ सालच्या अंडर १९ विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंड संघावर ३ गडी राखून विजय मिळवला होता. योगायोग म्हणजे, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच होता. त्यामुळे यंदाच्या उपांत्य सामन्यात विराट पुन्हा विल्यमसनवर भारी पडणार का हे पाहावे लागेल.
२००८ च्या अंडर १९ वर्षीय विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीने केले. या विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात भारताची लढत न्यूझीलंड संघाशी झाली. तेव्हा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हा होता. पुन्हा आता ११ वर्षानंतर विराट केन विल्यमसनला धुळ चारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर केन विल्यमसन २००८ साली झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल.
२००८ साली झालेल्या अंडर १९ च्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत ८ बाद २०५ धावा केल्या होत्या. याला प्रत्त्युत्तर देताना भारतीय संघाच्या १९१ धावा केल्या. तेव्हा पावसाला सुरूवात झाली. यामुळे भारताने हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार ३ गडी राखून जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला विराट कोहलीने बाद केले होते. कोहली या सामन्यात ७ षटकात २७ धावा देत २ गडी बाद केले होते. या कारणाने विराट कोहलीला सामनावीरचा पुरस्कारही देण्यात आला होता.
आता तेच कर्णधार पुन्हा विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दोन हात करायला उभे आहेत. एकीकडे कोहलीचा संघ तुफान फार्मात आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडनेही चांगली कामगिरी बजावत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.